लांबोट्यात वीज पडून महिला आणि म्हशीचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात आज अचानक वादळीवाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही गावांमध्ये मोठे नुकसान केले आहे. लांबोटा येथे वीज पडून एक महिला आणि एका म्हशीचा मृत्यू झाला.

निलंगा तालुक्यातील लांबोटा येथे आपल्या शेतातील म्हैस घेऊन घराकडे जात असलेली महिला उषाबाई लक्ष्मण आवटे (45) यांच्यासह म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने दोघींचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी अचानक निलंगा शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. मृत महिलेचे प्रेत निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यातील ताजपूर येथे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.