लहान मुलाचा बाप IAS अधिकारी का माजी आमदार ? महिलेची डीएनए चाचणीसाठी न्यायालयात धाव

राजकारणात सक्रीय असलेल्या एका महिलेने पाटणा उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमुळे खळबळ उडाली आहे. या महिलेला 4 वर्षांचा मुलगा आहे. हा मुलगा बिहारमधल्या आयएएस अधिकाऱ्याचा आहे का माजी आमदाराचा हे कळावं यासाठी डीएनए चाचणी करण्यात यावी अशी मागणी या महिलेने केली आहे. ज्या सनदी अधिकाऱ्याचे या महिलेने नाव घेतले आहे तो अधिकारी बिहारमधील वरिष्ठ अधिकारी आहे. ज्या माजी आमदाराचं या महिलेने याचिकेत नाव घेतलं आहे तो बिहारमध्ये सध्या सत्तेत असलेल्या पक्षाचा माजी आमदार आहे.

याचिकाकर्त्या महिलेने आरोप केला आहे की या अधिकाऱ्याने आणि माजी आमदाराने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. या बलात्कारानंतर ती गर्भवती राहिली होती आणि तिने मुलाला जन्म दिला होता. मूल झाल्यानंतर ही महिला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांकडे गेली होती, मात्र या दोघांनी हे मूल आपलं मानण्यास नकार दिला होता. यामुळे या महिलेने या दोघांची डीएनए चाचणी करावी आणि आपल्या मुलाचा बाप नक्की कोण आहे हे सांगावं अशी याचिका केली आहे.

माजी आमदाराने आपल्याला महिला आयोगाचा अध्यक्ष बनवतो असे सांगून आपल्यावर बलात्कार केला होता. यानंतर त्याला सनदी अधिकाऱ्याचीही साथ मिळाली आणि त्यानेही माझ्यावर बलात्कार केला असं या महिलेने म्हटलंय. या अधिकाऱ्याने आपले व्हिडीओ रेकॉर्ड करून त्या आधारे ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केला असंही या महिलेचं म्हणणं आहे.