डॉक्टरकडे जाण्यासाठी 30 रुपये मागितले म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

425

केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधात कडक कायदा लागू केलेला असताना देखील देशभरात आजही तिहेरी तलाक देण्याचे प्रकार सुरू आहेत. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये तापाने फणफणलेल्या एका पत्नीने डॉक्टरकडे जाण्यासाठी पतीकडे अवघे तीस रुपये मागितले म्हणून त्याने तिला तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रुखसार अहमद (20) असे त्या महिलेचे नाव असून तिचा तीन वर्षांपूर्वी सुलतान नावाच्या व्यक्तीसोबत निकाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनंतरच सुलतान रुखसारचा छळ करू लागला. सुलतान व रुखसारला सहा महिन्यांची मुलगी देखील आहे. गेल्या आठवडाभरापासून रुखसार व तिची मुलगी तापाने फणफणली होती. मुलीवर उपचार सुरू होते. मात्र पैशांअभावी रुखसार डॉक्टरकडे गेली नव्हती. बकरी ईदचा सण दोन दिवसांवर आल्याने तोपर्यंत ठीक व्हावे म्हणून रुखसारला डॉक्टरकडे जायचे होते. त्यासाठी शनिवारी तिने सुलतानकडे तीस रुपयांची मागणी केली. मात्र त्यावरून तो तिच्याशी वाद घालून मारहाण करू लागला. सुलतानचे दोन भाऊ व आई देखील रुखसारला मारहाण करू लागले. त्यानंतर सुलतानने सर्वांसमोर रुखसारला तिहेरी तलाक दिला व घरातून हाकलून दिले.

त्यानंतर रुखसार तिच्या माहेरी गेली व तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी सुलतान व त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तिहेरी तलाक विरोधातील नव्या कायद्या अंतर्गत पोलिसांनी सुलतानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या