पाणी भरण्याच्या वादातून महिलेचे कान कापले

सामना ऑनलाईन । कोलार

कर्नाटकातील कोलारमध्ये पाणी भरण्याच्या वादातून एका महिलेला कान गमवावे लागले आहे. सार्वजनीक नळावर पाणी भरण्यावरून या महिलेचा शेजारच्या महिलेशी वाद झाला. या वादानंतर दोन दिवसांनी शेजारच्या पाच जणांनी महिलेवर हल्ला करून तिचे दोन्ही कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंद्रायणी असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे.

कोलारच्या हूलकूर ग्रामपंचायतीत ही घटना घडली. गावकऱ्यांनी केलेल्या नियमानुसार सार्वजनीक नळावर प्रत्येकजण चार बादल्या पाणी भरू शकतो. इंद्रायणी मंगळवारी सार्वजनीक नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी असलेल्या यशोधामा यांनी चार बादल्या पाणी भरल्यानंतरही त्या आणखी पाणी भरत होत्या. त्यामुळे इंद्रायणी यांनी त्यांना हटकले. त्यामुळे रागाच्या भरात यशोधामा यांनी इंद्रायणी यांची बादली फेकून दिली. त्यामुळे त्या दोघींमध्ये वाद झाला. त्यावेळी गावकऱ्यांनी मध्यस्ती करून वाद सोडवला. त्यानंतर गुरुवारी सकाळी इंद्रायणी गोठ्यातून घरी परतत असताना पाचजणांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे दोन्ही कान कापले. या घटनेनंतर इंद्रायणीचा नवरा रघुपती यांने यशोधामा यांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे यशोधामाच्या कुटुंबीयांनी रघुपतीला मारहाण केली. त्यात त्यांच्या नाकाला दुखापत झाली आहे.