अजब न्याय; तिने 312 रुपयांसाठी 41 वर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या!

29

सामना ऑनलाईन । लखनौ

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात तेच खरे. याचा प्रत्यय आणखी एकीला आलाय. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील महिलेला तिची कोणतीही चूक नसताना केवळ 312 रुपयांसाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 41 वर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या आहेत. न्यायालयातील एका कारकुनाने केलेली चूक आयुष्यभर या महिलेला भोवली. अखेर नेमकी गडबड लक्षात येऊन शुक्रवारी हे प्रकरण मिटले आणि महिलेने सुटकेचा निःश्वास टाकला.

1975 साली गंगादेवी नावाच्या महिलेचे घर तहसीलदारांनी जप्त केले होते. हे प्रकरण स्थानिक न्यायालयात गेले. 1977 साली न्यायालयाने गंगादेवीला कोर्टाची फी म्हणून 312 रुपये जमा करण्यास सांगितले. गंगादेवींनी फी भरल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने पुन्हा हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात पाठवले, मात्र त्याचवेळी कारकुनाच्या चुकीमुळे गंगादेवींनी कोर्टाची फी भरल्याची नोंद झाली नाही. यामुळे या प्रकरणात 41 वर्षे गंगादेवींना कोर्टात जावे लागले.

तारीख पे तारीख मिळत राहिली. त्यांचे प्रकरण 11 न्यायाधीशांच्या समोर आले, मात्र तरीही क्लार्कची चूक कुणाच्याही नजरेत आली नाही. अखेर 7 सप्टेंबर 2018 रोजी न्यायमूर्ती लवली जयस्वाल यांच्यासमोर हे प्रकरण आले आणि 312 रुपयांची गडबड लक्षात आली. अखेर हे प्रकरण संपुष्टात आले असून 80 वर्षांच्या गंगादेवींनी सुटकेचा निःश्वास टाकला.

summary- woman awaited justice for 41 yrs for 312 rupees

आपली प्रतिक्रिया द्या