महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा, साताऱ्यात सहाजणांवर गुन्हा दाखल

सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद नोंदविण्यासाठी आल्यानंतर झालेल्या वादावादीनंतर त्या ठिकाणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेत गोंधळ घातल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्यात पूजा राजाराम थोरात (वय 28) या कार्यरत आहेत. सायंकाळी त्या इतर सहकाऱ्यांसमवेत पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. यादरम्यान त्याठिकाणी जावेद बन्सी सय्यद, पूजा जावेद सय्यद (दोघेही रा. भीमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टी, सदरबझार, सातारा) हे आले.

त्यावेळी अक्षय सुरेश शिवगण, अमृता अक्षय शिवगण, जया सुरेश शिवगण, पूजा सुरेश शिवगण (सर्व रा. 196 रविवार पेठ, सातारा) हे आले. त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे एकमेकांविरोधात तक्रार असल्याचे सांगितले. याचदरम्यान दोन्ही गटांत वाद झाला. वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर त्यात उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. याचवेळी अमृता अक्षय शिवगण हिने पोलीस कर्मचारी पूजा थोरात यांच्या हाताला चावा घेतला. यामुळे गोंधळ उडाला असतानाच जावेद सय्यदने पोलीस ठाण्यातील सीसीटीएनएस कक्षाकडे धाव घेत त्याठिकाणच्या काचेवर डोके आपटून घेतले.

पोलीस ठाण्यात गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा आणून पोलीस कर्मचाऱ्यास दुखापत केल्याप्रकरणी पूजा थोरात यांनी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. यानुसार सहाजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक ए. ए. वाघमोडे हे करीत आहेत.