
बंगळुरूतील सिद्दापुरा पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. बायकोचा खून केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही अटक मंगळवारी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शेख फारूख असं या आरोपीचं नाव असून तो जयानगर भागातील दयानंदरनगरात राहात होता. नाझिया हिचा खून केल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
नाझिया हिला शेख फारूखने सोमवारी 6500 रुपये दिले होते. घरभाडं भरण्यासाठी म्हणून त्याने तिला हे पैसे दिले होते. नाझियाने या पैशांचा वापर व्यवसायासाठी करू असा विचार केला होता. या पैशातन तिने इमिटेशन ज्वेलरी (खोटे दागिने) विकत घेऊ आणि ते दिवाळीमध्ये विकू असा विचार केला होता. 6500 रुपयांत आपल्याला बरेच दागिने घेता येतील आणि ते विकून आपल्याला चांगला फायदाही होईल असा विचार नाझियाने केला होता. सोमवारी रात्री शेख घरी आल्यानंतर त्याने नाझियाला घरभाडं भरलं का असा प्रश्न विचारला होता. नाझियाने घरभाड्याच्या पैशातून आपण दागिने विकत घेतल्याचं सांगितल्यावर शेखचं डोकं फिरलं होतं.
नाझियाने शेखला सांगितलं की घरभाड्याच्या रकमेतून तिने खोटे दागिने विकत घेतले असून 2 दिवसांनी ती भाडं भरून टाकेल. मात्र ही गोष्ट शेखला आवडली नाही, ज्यामुळे त्याचं आणि नाझियाचं कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात शेखने नाझियाला बुक्का मारला आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं. जबरी मार लागल्याने नाझिया जमिनीवर कोसळली होती. ही बाब नाझियाच्या मुलीने तिच्या आईला कळवली होती. नाझियाच्या आईने इतरांच्या मदतीने नाझियाला रुग्णालयात दाखल केलं, उपचार सुरू असताना नाझियाने प्राण सोडला असं पोलिसांनी सांगितलं आहे. नाझियाच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शेखला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.