शेतातील झोपडीवर वीज पडून वृद्ध महिला ठार ; दोन महिलासह चिमुकली जखमी

62

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शिवारात काम करणार्‍या वयोवृद्ध महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. शेतात काम करणाऱ्या दोन महिला व एक तीन वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. ही घटना नांदुरा तालुक्यातील उदेपूर शिवारात शुक्रवार 19 जुलै रोजी दुपारी तीन वाजता घडली.

तालुक्यातील अलमपूर येथील सारजाबाई शालीग्राम भगत (70) ही वयोवृद्ध महिला अलमपूर गावाजवळील उदेपूर शिवारातील बहिणीच्या मुलाच्या शेतात गावातील इतर काही महिलांसोबत काम करीत होती. शुक्रवाऱी दुपारी परिसरात पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने व विजांचा कडकडाट होत असल्याने शेतात काम करणारी वयोवृद्ध महिला व तीच्या सोबतच्या इतर महिलांनी विजय तायडे यांच्या शेतातील कडूनिंबाच्या झाडाखालील झोपडीत धाव घेतली. याचवेळी कडूनिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने यामध्ये सारजाबाई भगत यांचा मृत्यू झाला. तर इतर दोन महिला कमलाबाई शेषराव मोरे (50) व नीता जितेंद्र मोरे (30) सोबत असलेली छोटी चिमुकली मुलगी निधी जितेंद्र मोरे (3) या तिघी जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, पत्रकार प्रवीण डवंगे व कार्यकर्त्यांनी अलमपुर गाठुन मृतक महिलेला ओमसाई फाऊंडेशनच्या अ‍ॅम्ब्युलन्सने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. जखमी महिलांना गावातील ऑटोचालक व गावकर्‍यांनी ऑटोमधून उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

आपली प्रतिक्रिया द्या