प्रियकराने रागात थप्पड लगावली; प्रेयसीचा मृत्यू

728

संशयामुळे अनेक नातेसंबंध एका क्षणात दुरावतात. अनेकदा संशयामुळे जवळच्या व्यक्तींशी मतभेद होतात. त्यामुळे कायमचा दुरावा येतो. मात्र, संशयामुळे राग आल्याने एका प्रियकराला थेट तुरुंगात जावे लागले आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये ही विचित्र घटना घडली आहे.

एकमेकांवर जीवपाड प्रेम करण्याऱ्या प्रियकराच्या मनात प्रेयसीबाबत संशय निर्माण झाला. त्याने रागाच्या भरात प्रेयसीला जोरदार थप्पड लगावली. त्यामुळे प्रेयसी चक्कर येऊन जागीच बेशुद्ध पडली. तिला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक करून त्याची चौकशी केली. सीता प्रधान ( वय 35) या मानखुर्द येथील सार्वजनिक शौचालयाजवळ  एका व्यक्तीशी बोलत होत्या. त्यांना दुसऱ्या माणसाशी बोलताना पाहून त्यांचा प्रियकर राजू पुजारी याल्लपा याला संशय आला. त्याने रागाच्या भरात  सीताला  जोरात थप्पड लगावली. त्यानंतर त्या जमिनीवर बेशुद्ध पडल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राजूने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबूली दिली आहे.

याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणखी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी नितीन बोहाडे यांनी सांगितले. यालप्पाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या