रुग्णवाहिका-स्ट्रेचर नाही मिळाले; कोरोनाबाधित सासऱ्याला सुनेने पाठीवर उचलून नेले रुग्णालयात, स्वतःही झाली पॉझिटिव्ह

कोरोना संकटाला घाबरून अनेक नातेवाईक आपल्या माणसांपासून दुरावताना दिसत आहेत. जवळच्या एखाद्याला कोरोना झालाच तर त्यापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात. अशा वेळी आसाममध्ये एका महिलेने रुग्णवाहिका-स्ट्रेचर नाही मिळाला म्हणून कोरोनाबाधित सासऱयाला सुनेने पाठीवर उचलून रुग्णालयात नेत माणुसकीचे दर्शन घडवले. दरम्यान, निहारिकाची चाचणी करण्यात आली असता तीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आलीय.

आसाममधील भाटीगावच्या राहा येथील रहिवासी 75 वर्षीय थुलेश्वर दास यांची तब्येत 2 जून रोजी अचानक बिघडली आणि त्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसू लागली. थुलेश्वर यांचा मुलगा सूरज कामानिमित्त घरापासून दूर राहतो. त्यामुळे पतीच्या गैरहजेरीत निहारिका आपल्या सासऱयांची काळजी घेते.  सासऱयांना रुग्णालयात नेण्यासाठी तिने रुग्णवाहिका-स्ट्रेचर मिळविण्याचा प्रयत्न केला. एका रिक्षावाल्याशी संपर्क करून त्याला येण्यास सांगितले, मात्र बराच वेळ झाला तरी काहीच व्यवस्था झाली नाही. त्यामुळे निहारिकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन किलोमीटर अंतर पायी चालत सासऱयांना पाठीवरून रुग्णालयात नेले. कोरोनाबाधित सासऱयांचा जीव वाचविण्यासाठी निहारिकाने खूप कष्ट घेतले, मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीन दिवसांनी थुलेश्वर यांचा मृत्यू झाला. निहारिकाची चाचणी करण्यात आली असता तीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आलीय.  सध्या निहारिका क्वारंटाइन आहे.

सून असावी तर अशी

वृद्ध सासऱयांना पाठीवर उचलून नेतानाचा निहारिकाचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. अनेकांनी तिला आदर्श सून असे म्हटले असून  ‘सून  असावी  तर अशी’ असे म्हणत सासऱयांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत केलेल्या धाडसाबद्दल निहारिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या