प्रेमविवाहासाठी तरुणीचं कुभांड, पैशासाठी आई-वडिलांनीच विकल्याचा खोटा आरोप

2126

प्रेमविवाह करण्यासाठी एका मुलीने स्वतःच्याच आईवडिलांवर तिला विकल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात ही घटना घडली असून या घटनेतील तरुणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी खोटे आरोप करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील मेरठ येथे राहणाऱ्या एका तरुणीने इंटरनेटवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्या व्हिडीओत तिच्या आई-वडिलांनी तिला पाच लाख रुपयांसाठी विकल्याचं ती सांगत होती. तसंच कित्येक महिन्यांपासून तिला एका ठिकाणी कैद करून ठेवण्यात आलं असून तिला लवकरच हरयाणातील व्यवहार झालेल्या माणसाला विकण्यात येणार आहे, असं ती या व्हिडीओत म्हणत होती.

हा व्हिडीओ एका सामाजिक संस्थेपर्यंत पोहोचला आणि त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्या तरुणीला शोधून काढलं. ती बागपत जिल्ह्यात तिच्या आत्याकडे होती. तिथून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे या प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा मात्र, पोलिसांसमोर तिने जी कबुली दिली, ती धक्कादायक होती.

या तरुणीने दिलेल्या जबाबानुसार, तिला तिच्या प्रियकराशी लग्न करायचं होतं. पण तिचे आई वडील नाराज होते. प्रियकराशी लग्न करण्याचा तिचा हट्ट पाहून त्यांनी तिला काही दिवस तिच्या आत्याच्या घरी पाठवलं होतं. मात्र, प्रेमविवाह करायचाच या हट्टापायी या तरुणीने व्हिडीओ बनवून व्हायरल केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिने आई-वडिलांवर खोटे आरोप केले आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या