कचऱ्याने भरले होते घर; उपाशी मुलांना देत होती भटक्या कुत्र्यांचे मांस

युक्रेनमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. ही महिला गल्लीतील भटक्या कुत्र्यांना मारून त्यांचे मांस आपल्या उपाशी मुलांना खायला देत होती, असा आरोप महिलेवर ठेवण्यात आला आहे. त्या महिलेने घरात अनेक वर्षांपासून कचरा भरून ठेवला होता. तिच्या घरात उंदीर आणि झुरळे यांचे साम्राज्य होते. तिच्या घरातील परिस्थिती बघून पोलीसही चक्रावून गेले.

युक्रेनच्या उत्तर पूर्वेकडील खारकीव शहरात 30 वर्षांची लिलिया ग्रेनेन्को नावाची महिला दोन मुलं आणि आईसोबत राहते. तिने तिच्या घरातच अनेक वर्षांपासून कचरा जमा करून ठेवला होता. त्यामुळे तिच्या घरात झुरळे आणि उंदीर यांचे साम्राज्य होते. या महिलेची आर्थिक स्थिती खूप बिकट असल्याची माहिती मिळाली आहे. बिल भरले नसल्याने या महिलेच्या घरातील वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता.

लिलिया आपल्या मुलांना घराबाहेर पडू देत नव्हती. पोलिसांनी तिच्या घराची तापसणी करत तिच्या दोन मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत असल्याने त्यांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामांची माहिती घेत त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत. लिलियाच्या मानसिक स्थितीचिही तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या महिलेच्या शेजारच्यांनी पोलिसांना तिच्या घराच्या दूरवस्थेबाबतची माहिती दिली होती. या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थिती बघून तेही चक्रावले. पूर्ण घरात कचरा पसरलेला होता. लिलियाच्या दोन वर्षांच्या मुलाच्या अंगावर कपडेही नव्हते. एका वापरलेल्या नॅपीमध्ये त्याला झोपवण्यात आले होते. पोलीस त्या मुलाला रुग्णालयात नेत असताना ती परिस्थिती बघून एका शेजाऱ्याने मुलाला गुंडाळण्यासाठी चादर दिली.

आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने लिलिया तिच्या उपाशी मुलांना भटक्या कुत्र्यांना मारून त्यांचे मांस खायला देत असल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती उघड झाल्यावर शहरातील प्राणीमित्र संघटनांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. लिलियाला पाच मुले असून तीन मुलांचा ताबा तिला मिळालेली नाही. लिलियाची मानसिक तपासणी होणार आहे. या प्रकरणी ती दोषी आढळल्यास तिला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. ती मनोरुग्ण आहे की आर्थिक तंगीमुळे ती असे वागत होती, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या