बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेला 15 लाखांचा दंड

बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या एका महिलेला कोर्टाने 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण चेन्नई येथील असून या दंडाची रक्कम सदर पुरुषाला नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेतील महिला आणि संतोष नावाचा तरुम एकमेकांच्या शेजारी राहत होते. त्यांचे कुटुंबीय देखील एकमेकांना ओळखत होते. दोन्ही कुटुंबे एकाच विशिष्ट समाजातील असल्याने संतोष भविष्यात या महिलेशी लग्न करणार, असंही या कुटुंबात ठरलं होतं. मात्र, काही काळाने त्यांच्यात वाद झाले आणि ही दोन्ही कुटुंबं विभक्त होऊन वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली.

दरम्यान, संतोषने एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभियंता शाखेचा अभ्यास सुरू केला होता. त्यानंतर काही दिवसांनी महिलेचे आई वडील संतोषच्या घरी आले. त्यांनी आपली मुलगी तुझ्यापासून गर्भवती असल्याचं संतोषला सांगितलं आणि आता तुम्हाला विवाह करावा लागेल, असा दबाव आणला. संतोषने तिच्यासोबत असं कोणतंही नातं नसल्याचं सांगितलं. त्यानंतर या महिलेने संतोषविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं तेव्हा डीएनए चाचणी करण्यात आली. डीएनए चाचणीत संतोष महिलेच्या पोटातील बाळाचा पिता नाही, हे सिद्ध झालं. मात्र, या आरोपांमुळे त्याच्या आयुष्याचं आणि करिअरचं नुकसान झालं. त्याला अभ्यास मध्येच सोडून द्यावा लागला. तसेच साधा वाहनचालक परवाना मिळवतानाही अडचणी येऊ लागल्या.

बलात्कारासारखा गंभीर आरोप असल्याने त्याला तब्बल 95 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले. याची नुकसान भरपाई म्हणून 30 लाख रुपयांची मागणी संतोषने न्यायालयासमोर केली होती.

संतोषला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल चेन्नई येथील कोर्टाने महिलेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम संतोष याला नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या