महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप ठरणार संस्मरणीय, आदित्य ठाकरे यांचा विश्वास

214

यंदा हिंदुस्थानात आयोजित करण्यात येणारा 17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप कोरोना व्हायरसमुळे आता पुढल्या वर्षी खेळवण्यात येणार आहे. 2021 सालात 17 फेब्रुवारीपासून गुवाहाटी येथे या स्पर्धेला सुरूवात होईल. या स्पर्धेच्या अनुशंगाने स्थानिक आयोजन समिती व महाराष्ट्र सरकारमधील प्रतिनिधी यांच्यामध्ये गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. याप्रसंगी राज्याचे पर्यावरणमंत्री, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष (एमडीएफए) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विश्वास व्यक्त करताना म्हटले की, हिंदुस्थानात होणाऱया महिलांच्या पहिल्यावाहिल्या वर्ल्ड कपला उदंड प्रतिसाद मिळावा यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करण्यात येत आहे. आमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि या स्पर्धेत सहभागी होणारे जगभरातील संघ व फुटबॉलप्रेमींसाठी ही स्पर्धा संस्मरणीय ठरील.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 17 वर्षांखालील महिलांच्या वर्ल्ड कपचे आयोजन करण्याची संधी हिंदुस्थानला मिळाली. याचा अभिमान आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा अंतिम सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे आनंद द्विगुणीत झालाय. गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढतोय. पण परिस्थिती नक्कीच नियंत्रणात येईल. तसेच हिंदुस्थानात होणाऱया वर्ल्ड कपचे आयोजनही यशस्वी पार पाडू, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी पुढे व्यक्त केला.

महाराष्ट्र सरकार, क्रीडा विभागाचे सहकार्य
महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यावेळी म्हणाले, 17 वर्षांखालील महिलांच्या वर्ल्ड कपचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार तसेच क्रीडा विभागाचे सहकार्य लाभत आहे. या बैठकीत पुढच्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीला आदित्य ठाकरे, सुनील केदार यांच्यासह वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन व डी वाय पाटील स्टेडियमचे पदाधिकारीही उपस्थित होते. या स्पर्धेचा अंतिम सामना 7 मार्च रोजी डी वाय पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे.

महिलांच्या खेळांच्या विकासासाठी पुढाकार
आगामी महिन्यांमध्ये महिला खेळांच्या विकासासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. तसेच फुटबॉल या खेळातील मुलींची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या