समलिंगी असूनही महिलेशी प्रेमविवाह केला, पत्नीची पोलिसांत तक्रार

गुजरातमधील गांधीनगर भागात राहणाऱ्या महिलेने तिच्या नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. आपल्या नवऱ्याकडून आपल्याला कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचं तिने तक्रारीत म्हटले होते. पोलिसांना सुरुवातीला ही नेहेमीसारखी कौटुंबिक छळाचे प्रकरण वाटले होते, मात्र महिलेचे म्हणणे ऐकल्यानंतर हे प्रकरण विचित्र असल्याचे पोलिसांना कळाले. या महिलेचा नवरा हा समलिंगी आहे. तरीही त्याने या महिलेशी प्रेमविवाह केला होता.

अर्पिता आणि आकाश (बदललेली नावे) यांची भेट पहिल्यांदा 2008-2009 साली झाली होती. लायब्ररी सायन्सचे शिक्षण घेत असताना हे दोघे एकमेकांना भेटले होते. ओळख वाढली आमि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2011 साली या दोघांनी लग्न केले. अर्पिताने आकाशसोबत लग्न केल्याची बाब तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवली होती. कालांतराने हे दोघे एकत्र राहायला लागले. लग्नाच्या एक दीड वर्षांनी अर्पिताला संशय यायला लागला की तिच्या पतीचे पुरुषांसोबत संबंध आहेत. आपला नवरा समलिंगी असल्याचे तिला कळायला लागले होते. एके दिवशी तिने आकाशला तो समलिंगी आहे का असा थेट प्रश्न विचारला.

अर्पिताच्या प्रश्नावर आकाशने आपण समलिंगी असल्याचे मान्य केले. कमावती असल्याने अर्पिताशी लग्न केल्याचे आकाशने सांगितले, याशिवाय तिच्यापासून त्याला मूल हवे होते यासाठी त्याने तिच्यासोबत प्रेमविवाह केल्याचेही सांगितले. अर्पिताच्या माहेरची परिस्थिती उत्तम होती. मात्र तिने घरच्यांच्या मनाविरूद्ध लग्न केल्याने ती त्यांच्याकडे मदत मागू शकत नव्हती. आकाश हा एका कॉलेजमध्ये लायब्ररियन म्हणून कामाला होता, मात्र त्याची नोकरी काही महिन्यांपूर्वी गेली होती. अर्पिताने त्याला याचं कारण विचारलं तेव्हा त्याने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला संशय आल्याने तिने त्याचे ईमेल तपासले, तेव्हा तिला पुरुषांसोबत त्याने केलेली अश्लील संभाषणे सापडली.

अर्पिताने आकाशबद्दल त्याच्या बहिणीला सांगितले तेव्हा तिने उलट तिच्याच चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली होती. मूल झाल्यावर सगळं नीट होईल असं सांगून त्याच्या बहिणीने अर्पिताला गप्प बसवलं. अर्पिताला थायरॉईडची समस्या उद्भवल्यानंतर आकाशने तिला सांगितले की तू मला आता आवडत नाहीस आणि माझ्या समलिंगी संबंधांमध्ये अडसर बनू नकोस. यानंतर तिने गांधीनगर इथल्या महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली

आपली प्रतिक्रिया द्या