शेतातून ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी टोल मागणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

160
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, लातूर

माझ्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही, ट्रॅक्टर घेऊन जायचे असेल तर 10 हजार रुपये टोल द्यावा लागेल म्हणून ट्रॅक्टर अडवणाऱ्या महिलेविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी शिवारात घडली.

या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात बापूसाहेब गोपीनाथ चव्हाण (रा. गोविंद नगर रेणापूर) यांनी तक्रार दाखल केली. पानगाव येथील चंद्रचूड चव्हाण यांच्या शेतातील विहीरीवरील भराव घेऊन फिर्यादीचे ट्रॅक्टर पाथरवाडी शिवारातील चंद्रचूड चव्हाण यांच्या शेतात टाकण्यासाठी चालक पांडूरंग माणिक चव्हाण हा जात होता. पाथरवाडी शिवारातील तळ्याच्या सांडव्यातून जुन्या शासकीय पाणंद रस्त्याने जात असताना पाथरवाडी येथील पंचफुला नागेराव जाधव यांनी ट्रॅक्टरच्या चालकास शिवीगाळ केली. जबरदस्तीने ट्रॅक्टर महादू निवृत्ती गुरमे यांच्यामार्फत त्यांच्या शेतात घेऊन गेले.

चालकाने याची माहिती फोनवरुन कळवल्यामुळे शेतात जाऊन त्यांना विचारले असता माझ्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही. ट्रॅक्टर घेऊन जायचे असेल तर 10 हजार रुपये टोल द्यावा लागेल. 10 हजार दिल्याशिवाय ट्रॅक्टर सोडणार नाही. पोलीस ठाण्यात तक्रार करतो असे म्हटले असता अब्रु नुकसानीची केस करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या