पॅरिसच्या आयफेल टॉवरलाही होती एक ‘बायको’, आता भलत्यावरच जडलं प्रेम

विवाह हे दोन जिवांना एकत्र बांधणारं पवित्र बंधन मानलं जातं. या नात्यात गुंतलेले लोक एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याची वचनं देतात. वास्तविक विवाह ही कल्पना दोन सजीव घटकांमध्ये होणं अपेक्षित असतं. पण, काहींच्या आवडी निवडी थोड्या वेगळ्या असतात. अशाच वेगळी आवड असलेल्या एका महिलेने चक्क पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरशी लग्न केलं.

काही व्यक्तिंना दुसरी जिवंत व्यक्ती न आवडता वस्तू आवडतात. त्यांच्याविषयी आकर्षण वाटतं. असंच आकर्षण एरिका नावाच्या महिलेला वाटलं आणि तिने 2007 साली आयफेल टॉवरशी विवाह केला. 50 वर्षांची एरिका ही सध्या अमेरिकेत राहते. तिने 2007 साली पॅरिसमधील या प्रेमाच्या प्रतिकाशी विवाह केला होता. विवाहानंतर तिने आपलं आडनावही बदललं.

आता सुमारे 15 वर्षांनी एरिका पुन्हा प्रेमात पडली आहे. यावेळी ती घरांबाहेर लावण्यात येणाऱ्या लाकडी कुंपणांच्या प्रेमात पडली आहे. अर्थात तिने तिचा आयफेल टॉवरशी केलेला विवाह अद्याप मोडलेला नाही. कुंपण हे दिसायला धोकादायक दिसलं तरी ते मला आवडतं, अशी कबुली एरिकाने दिली आहे.

एरिकाला वाटणाऱ्या या आकर्षणाच्या प्रकाराला ऑब्जेक्ट सेक्शुअॅलिटी म्हणतात. जगभरात अनेक लोक असे असतात ज्यांच्या लैंगिक निवडी वेगळ्या असतात. कुणाला समलिंगी व्यक्तीसोबत राहावसं वाटतं, तर कधी काही जण भिन्नलिंगी व्यक्तींसोबत राहणं पसंत करतात. तर काही स्वतःच्याच प्रेमात इतके आकंठ बुडालेले असतात की, स्वतःशीच लग्न करतात. काही जणांना खेळण्यांवर प्रेम जडतं. पण, या सगळ्या प्रकारांहून भिन्न असा लैंगिक निवडीचा प्रकार म्हणजे ऑब्जेक्ट सेक्शुअॅलिटी. या प्रकारात माणसाला निर्जीव वस्तुंवर प्रेम करावंसं वाटतं, त्यांच्याविषयी लैंगिक आकर्षण वाटतं.