म्हशीवर काळी जादू करत असल्याच्या संशयातून छत्तीसगडमध्ये महिलेची हत्या

73

सामना ऑनलाईन । जैशपूर ( छत्तीसगड)

छत्तीसगडमधील जैशपूर जिल्ह्यात जिलिंग या आदिवासीबहुल गावात एक महिला म्हशीवर काळी जादू करत असल्याच्या संशयावरून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकारी लक्ष्मणसिंग धुर्वे यांनी सांगितले. अनिल राम भगत, त्याचा भाऊ विरेंद्र राम, त्याचा मित्र संतोष राम यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात आली आहे. त्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांना गावातील चांदनीबाई जादूटोणा भगत यांच्या म्हशीला मारण्यासाठी काळी जादू करत असल्याचा संशय होता. या काळ्या जादूमुळेच म्हैस दगावली असा त्याचा समज होता. या संशयातून त्यांची तिची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले आहे.

चांदनीबाईचा मुलगा जागीरराम भगत याने 6 जूनला पोलीस ठाण्यात आपली आई चांदनीबाई 2 जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या चौघांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी चांदनीबाईची हत्या केल्याची कबूली दिली. 2 जूनला चांदनीबाई घराबाहेर बसली असताना भगतने त्यांना मारहाण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर इतर दोघांच्या मदतीने मृतदेह कपड्यांमध्ये बांधून नीमगावजवळील नाल्यात फेकून दिला. भगत यांना 7 जूनला मृतदेह नाल्यावर तंरगताना आढळला. त्याने इतर दोघांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जवळच्या शेतात पुरला. त्यांनी गुन्हाची कबुली दिल्यानंतर दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चांदनीबाई आपल्या म्हशीवर काळी जादू करत असल्याचा संशय भगत यांना होता. तिच्या जादूटोण्यामुळे म्हैस दगावल्याचा त्यांचा समज होता. भगत यांची बायको 2015 मध्ये गर्भवती असताना सायकलवरून पडल्याने तिचा गर्भपात झाला होता. त्यानंतर भगत आणि त्यांच्या भावाने चांदनीबाईशी वाद घातला होता. त्यानंतर त्यांचे संबंध बिघडले होते. चांदनीबाईच्या जादूटोण्यामुळे आपल्या पत्नीचा गर्भपात झाला आणि तिच्या जादूटोण्यामुळेच आपली म्हैस दगावली असा भगत यांचा समज दृढ होत गेला. तिच्या जादूटोण्यामुळेच आपल्यावर संकटे येत आहेत, असे भगत यांना वाटत होते. त्यामुळे हा संशय बळावून त्यांनी 2 जूनला चांदनीबाईची हत्या केली आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरून टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तीन आरोपींवर खून, पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या