अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या मुलाचा आईनेच काढला काटा

सामना प्रतिनिधी , संभाजीनगर

अनैतिक संबंधास अडसर ठरत असलेल्या २८ वर्षीय मुलाचा दोरीने गळा आवळून खून करत त्याचा मृतदेह पडक्या विहिरीत टाकणाऱ्या जन्मदात्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात मृतदेह रिक्षात घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालक इंद्रजित हिरामण निकाळजे यास अटक करण्यात आली आहे.

१४ एप्रिल २०१८ रोजी कमल दिलीप बनसोडे यांची मुलगी जयंतीनिमित्त माहेरी आली होती. त्यावेळी कमल आणि मुलगा राहुल दिलीप बनसोडे यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यामुळे राहुलने आईला शिवीगाळ करत मारहाण केल्यामुळे संतापलेल्या आईनेदेखील राहुलला बेदम मारहाण केली. मुलीने आणि जावयाने मायलेकाचे भांडण सोडविले. मुलगी सासरी गेल्यानंतर १८ एप्रिल रोजी राहुल दारूच्या नशेत घरी आल्यावर पुन्हा त्याचा आई कमलसोबत वाद झाल्यामुळे संतापलेल्या कमलने राहुलचा दोरीने गळा आवळून खून केला व त्याचा मृतदेह जाधववाडी परिसरातील जुन्या पडक्या विहिरीमध्ये टाकला. त्यानंतर आई कमल बनसोडेनेच सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकNयाविरोधात तक्रार दिली.

पोलिसांना लागला सुगावा

पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या पथकाने आंबडेकरनगरात राहणाऱ्या कमल दिलीप बनसोडेच्या हालचालीवर नजर ठेवली. त्यावेळी तिच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने कमलबाईची चौकशी केली असता तिने मावशी खिरणा जगन्नाथ गायकवाड, मावस बहीण सुनीता राजू साळवे यांच्या मदतीने खून केला असल्याची कबुली दिली.

अनैतिक संबंधामुळे होत होता वाद

कमल बनसोडेचे काही वर्षांपासून एका कंत्राटदारांसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्या मायलेकाचे पटत नव्हते, कंत्राटदार घरी आलेला राहुलला चालत नसल्यामुळे तो आईसोबत कायम वाद घालत होता. मुली आणि जावयासमोर त्याने वाद घातला असल्याचा राग आल्यामुळे राहुलचा खून केल्याचे कमलने सांगितले असल्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.