धक्कादायक! नवऱ्याच्या प्रेयसीला मुलासह जिवंत जाळले

विवाहबाह्य प्रेमसंबंधातून एका महिलेने तिच्या पतीच्या प्रेयसीच्या घराला आग लावून तिला व तिच्या सहा वर्षीय मुलाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. सीमा गुप्ता असे आरोपी महिलेचे नाव असून ती डॉक्टर आहे. याप्रकरणी सीमासोबत तिचा पती सुदीप व त्याची आई सुलेखा यांना देखील अटक करण्यात आली आहे.

राजस्थानच्या भरतपूर येथील डॉ. सीमा गुप्ता यांचा पती सुदीप हा देखील डॉक्टरच आहे. सीमा यांचे काली बागची येथे क्लिनीक असून त्या क्लिनिकवर दीपा ही रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. तिथेच दिपा व सुदीप यांचे सूत जुळले होते. त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत सीमाला कळाल्यानंतर तिने दिपा हिला कामावरुन काढून टाकले. पण त्यानंतरही सुदीप आणि दिपाचे प्रेमसंबंध सुरुच होते. सुदीपने दिपाला एक घर देखील घेऊन दिले होते. तिथे दिपा व तिच्या सहा वर्षांचा मुलगा ऱाहायचा.

गुरुवारी सायंकाळी सीमा ही तिची सासू सुलेखासोबत दिपा ला धमकविण्यासाठी तिच्या घरी पोहोचली. तेथे त्या दोघींचे कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर सीमाने स्वत:सोबत आणलेले रॉकेल दीपाच्या घरात ओतले व घराला आग लावली. त्यानंतर सीमाने सासूसोबत तेथून पोबारा केला. मात्र जाताजाता तिने दीपाच्या घराच्या कड्या बाहेरून लावल्या.  काही वेळातच आग भडकली व संपूर्ण घरात पसरली.  घराला लागलेल्या आगीमुळे दीपा, तिचा 6 वर्षांचा मुलगा यांचा गुदमरून तसेच होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी डॉ.सुदीप, त्याची पत्नी डॉ. सीमा आणि आई सुलेखा यांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या