दैव देतं अन् कर्म नेतं! महिलेनं 190 कोटींची लॉटरी जिंकली; पण तिकीट ठेवलेली पँट धुतली!

दैव देतं पण कर्म नेतं’ या म्हणीचा प्रत्यय नुकताच कॅलिफोर्निया येथील एका महिलेला आला आहे. या महिलेनं तब्बल 190 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे; पण चुकून तिकीट ठेकलेली पँट धुवून टाकल्याने तिकीट खराब झाले आहे. त्यामुळे ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ असे म्हणण्याची वेळ या महिलेवर आली आहे.

हे लकी तिकीट लॉस एंजेलिसच्या एका दुकानातून विकले गेले होते. बुधवारी एक महिला त्या स्टोअरवर आली होती. तिने ही रक्कम जिंकल्याचा दावा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिने ते तिकिट खरेदी केले होते. तसेच त्या तिकिटाचा नंबर लिहून ठेवला होता. यानंतर तिने ते तिकीट पँटच्या खिशात ठेवले आणि विसरली. काही दिवसांनी तिने ती पँट लाँड्रीत धुण्यासाठी पाठविली. यामुळे ते तिकिट खराब झाले आहे. दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला तिकीट खरेदी करत असताना दिसत आहे. ही महिला येथून नेहमी तिकीट खरेदी करत असल्याने दुकानातला स्टाफदेखील तिला ओळखतो. मात्र तिने नेमके तेच तिकीट कशावरून खरेदी केले, असा पेच अधिकाऱयांपुढे निर्माण झाला आहे.

सध्यातरी इतर कोणीही या रकमेवर दावा करण्यासाठी पुढे आलेले नाही. लॉटरी कंपनीचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. जर कुणीच रकमेवर दावा करण्यासाठी पुढे आले नाही तर ही रक्कम कॅलिफोर्निया पब्लिक स्कूलला दान म्हणून देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या