मुंबईत महिलांच्या अब्रूवर घाला!

GANGRAPE IN BIHAR

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मुंबईच्या सुरक्षेचे ढोल सरकार कितीही बडवत असले तरी मुंबईत महिला सुरक्षित नाहीत हेच आज लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे उघड झाले आहे. ठाण्याहून दादरला निघालेल्या महिलेला सोबतच्या प्रवाशाने धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा अपंगांच्या डब्यात घडली. जिवाच्या आकांताने ओरडणाऱया या महिलेला दादर स्थानक येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरूच होती  तर दुसऱया घटनेत नालासोपारा येथे अब्रू वाचविण्यासाठी अवघ्या १२ वर्षांच्या मुलीने थेट गच्चीवरून खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. त्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर नायर रुग्णालयात तातडीचे उपचार सुरू आहेत. मुंबईत महिलांच्या अब्रूला हात घालणाऱ्या या दोन घटनांमुळे सुरक्षेचे साफ धिंडवडे निघाले असून त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईकर हादरून गेले आहेत.

nalasopara-girl-1

अब्रू वाचविण्यासाठी मुलीने मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी

वसई नराधमाच्या तावडीतून अब्रू वाचविण्यासाठी अवघ्या १२ वर्षांच्या मुलीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱयात उघडकीस आली आहे. हा सर्व भयंकर थरार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला असून गंभीर जखमी झालेल्या या चिमुरडीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.

नालासोपारा पूर्व येथील अलकापुरी येथे राहणारी मुलगी आर. के. महाविद्यालयाजवळील एका इमारतीत काही कामानिमित्त  गेली होती. त्याचवेळी तेथे आलेल्या व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेले. तेथे या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भेदरलेली ती मुलगी अब्रू वाचविण्यासाठी थेट टेरेसवरील कठडय़ावर चढली. तिने जिवाच्या आकांताने केलेल्या आरडाओरडय़ामुळे परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. कठडय़ावर चढलेली व भेदरलेली ती मुलगी पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. यावेळी गॅरेजमधील काही मेकॅनिक सहकाऱयांनी रिक्षाचे रबरी छत पकडून तिला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने ती रस्त्यावर जोरदार आदळल्याने गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्य़ात पडलेल्या या चिमुरडीला लागलीच मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नराधमाच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार

या मुलीचा जीव वाचविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतानाच टेरेसवर असलेल्या नराधमाने संधीचा फायदा घेत घटनास्थळावरून पोबारा केला. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेण्यात येत आहे.

rafiq-sheikh-railway-goon

धावत्या लोकलमध्ये महिलेला बेदम मारहाण

मुंबई – धावत्या लोकलमध्ये एका टॅक्सीचालकाने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी चालक रफिक चिनकान अली खान (३२) याला अटक केली आहे.

दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शबनम (नाव बदललेले) या लग्न होण्यापूर्वी आग्रीपाडा येथे कामाला जात होत्या. तेव्हा त्यांची भायखळा येथे रफिकसोबत ओळख झाली. कालांतराने दोघांची मैत्री झाली. रफिकला टॅक्सीची दुरुस्ती, डिझेल तसेच घरखर्चासाठी पैसे दिले होते. दरम्यान, शबनम यांचे लग्न झाले. गुरुवारी शबनम कल्याणला त्यांच्या पतीच्या घरी निघाल्या होत्या. रफिकने तिला भायखळा स्थानकात सोडले व रात्री १०.३०ला डोंबिवली स्थानकात भेटण्यास सांगितले. त्यानुसार रात्री शबनम यांनी भायखळय़ाला येण्यासाठी लोकल पकडली. त्या अपंगांच्या डब्यात बसल्या. डोंबिवली स्थानक येताच रफिकसुद्धा त्या डब्यात घुसला. यावेळी त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून बाचाबाची झाली. तेव्हा संतापलेल्या रफिकने शिवीगाळ करत शबनमला मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्याने शबनमचे कपडेदेखील फाडले. दादर स्थानक येताच शबनमने पोलिसांना घडला प्रकार सांगताच पोलिसांनी रफिकला अटक केली.