महिला पोलीस अधिकाऱ्याने दांडक्यांचा प्रसाद देताच चौक खाली झाला

ड्युटीच्या पहिल्याच दिवशी रस्त्यावर उतरण्याची संधी मिळाल्यावर कर्फ्यु मध्ये शहरात फिरणाऱ्यांना हात जोडून घरी जाण्याची विनंती केल्यावरही ही मंडळी विनंतीला जुमानत नसल्याचे बघून महिला पोलीस अधिकाऱ्याने दांडक्यांचा प्रसाद देणे सुरू करताच चौक खाली झाला. या अधिकाऱ्याचे नाव प्रियांका सादळकर असून त्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या आहेत.

उल्हासनगर शहरात लॉकडाऊन नंतरही नागरिक घरात बसण्यास तयार नाहीत. शहर बंद आहे की नाही, हे तपासण्यासाठी गाडीवर बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा मंडळींचा पाला ड्युटीच्या पहिल्याच दिवशी प्रियांका सादळकर यांच्या बरोबर पडला. त्यांना गजबजलेल्या कॅम्प नंबर 2 मधील नेहरू चौकात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. तेंव्हा त्यांनी फिरणाऱ्यांना हात जोडून घरी जाण्याची विनंती केली. पण ही मंडळी विनंतीला जुमानत नसल्याचे बघून प्रियांका सादळकर यांनी हात जोडणे सोडले हातात दांडका घेऊन झोडपण्यास सुरवात करताच चौक खाली झाला. ड्युटीचा पहिलाच दिवस गाजवणाऱ्या प्रियांका यांचे उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक रणवीर बायेस, संतोष गोरे यांनी कौतूक केले आहे.

प्रियांका सादळकर यांनी कोल्हापूरच्या अंबप वाडीत राहून समाजशास्त्र शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. 2016 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. 2017 मध्ये निकाल आला, 2018 ला नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेतले. विशेष प्रशिक्षण म्हणून राजस्थानमधील पाक सीमेवर पंधरा दिवस काढले. पण उल्हासनगरमध्ये पहिल्याच दिवशी दृष्टीस पडलेला रहिवाश्यांच्या बेशिस्तपणा आणि त्यातून परिस्थिती कशी हाताळायची हे प्रशिक्षण फक्त अनुभवातून मिळाले, असे प्रियांका सादळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या