ज्यूसमध्ये गुंगीचे औषध घालून रिक्षाचालकाचा महिलेवर अत्याचार

घरगुती काम करण्यासाठी भाडय़ाने लाकलेल्या रिक्षाच्या चालकाने महिलेला ज्यूसमध्ये गुंगीचे औषध घालून दिले. यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरात घडली आहे. आरोपीने अत्याचाराचे त्याचे न्यूड फोटोदेखील मोबाईलमध्ये टिपले. नग्न फोटो पतीला दाखवतो, अशी धमकी देत एप्रिल 2022 पासून पीडितेवर सतत अत्याचार करीत राहिला. धमकी देत त्याने पीडित महिलेकडून एक लाख रुपयेदेखील उकळले आहेत. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील ऊर्फ सोमनाथ धर्मराज आचलारे (रा. हत्तुरे वस्ती, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

घरगुती कामासाठी, भाजीपाला आणण्यासाठी, हॉस्पिटलला जाण्यासाठी पीडित महिलेने आचलारे याची रिक्षा भाडय़ाने लावली होती. नेहमीचा रिक्षावाला असल्याने पीडित महिलेचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. एप्रिल 2022मध्ये पीडित महिलेची तब्येत ढासळल्याने ती एका खासगी हॉस्पिटलला उपचारासाठी रिक्षामध्ये गेली होती. यावेळी आचलारे याने तिला ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले. पीडितेला गुंगी चढताच तिला सोलापूर शहरानजीक असलेल्या एका लॉजमध्ये घेऊन गेला. तिच्यावर अत्याचार करीत तिचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले. पीडित महिला शुद्धीवर आल्याकर तिच्या हे लक्षात आले. तिने रिक्षावाल्याला याबाबत विचारले असता अश्लील फोटो दाखवत तिला धमकी दिली. ‘तुझ्या पतीला फोटो दाखवतो, तुझ्या पतीला मारून टाकतो किंवा मी आत्महत्या करतो,’ अशी धमकी दिली. घडलेल्या घटनेमुळे घाबरून पीडित महिलेने वाच्यता केली नव्हती.

आरोपी सुनील आचलारे याचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पीडितेने त्याला वेळोवेळी रोख रक्कम, ऑनलाइन असे जवळपास एक लाख रुपये दिले होते. अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी देत ब्लॅकमेल करीत पीडितेला विविध ठिकाणी घेऊन जात पुन्हा अत्याचार केले. मात्र, पीडित महिलेला अत्याचार सहन न झाल्याने अखेर तिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी आचलारे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.