सुनेला वाचवण्यासाठी सासू सरसावली, मुलाच्या बंदुकीने त्याच्यावरच गोळी झाडली

सामना ऑनलाईन, हावडा

कोलकात्यातील हावडा जिल्ह्यात एका सासूने सुनेचा जीव वाचवण्यासाठी मुलावरच गोळीबार केला. सालिका गावामध्ये हा प्रकार घडला असून या गोळीबारात मुलगा जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी रेणू शर्मा(वय 60 वर्ष) या महिलेला अटक केली आहे. तिचा मुलगा मनोज याला एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मनोज हा ट्रक आणि टॅक्सी चालवण्याचं काम करतो. रात्री अपरात्री गाडी चालवणं भाग असल्याने त्याने सुरक्षेसाठी स्वत:जवळ दोन पिस्तुले ठेवली होती. या पिस्तुलांचं त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही हे पोलिसांना अजून कळालेलं नाही. मनोज रोज दारू प्यायचा आणि घरी येऊन तमाशा करायचा. तो बायकोला मारहाणही करायचा. हा त्रास तिला असह्य झाला होता. मनोजची बायको देवी शर्मा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय की मनोज तिला आणि सासूला गोळ्या घालेन म्हणून धमकी द्यायचा.

सोमवारी मनोज पुन्हा दारू ढोसून आला आणि दोन्ही हातात पिस्तुलं घेऊन देवी शर्मा हिला धमकवायला लागला. हे बघून मनोजची आई घाबरली आणि तिने सुनेला वाचवण्यासाठी मनोजशी झटापट केली. झटापटीमध्ये मनोजचे एक पिस्तुल तिच्या हाती लागले. या पिस्तुलातून तिने मनोजवर गोळी झाडली. या गोळीबारात मनोज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.