ऑनलाईन लेक्चरमध्ये उत्तर दिले नाही म्हणून आई मुलीला चावली, पेन्सिलही घुसवली

मुलगी ऑनलाईन लेक्चरमध्ये उत्तर देत नाही म्हणून एका आईने त्या मुलीचा चक्क जोरदार चावा घेत तिला टोकदार पेन्सिलने मारहाण केली आहे. त्या मुलीच्या लहान बहिणीने या प्रकरणी बालक सुरक्षा केंद्राला फोन करून कळवले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मुंबईतील सांताक्रुझ परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेतील 12 वर्षीय पीडित मुलीला आईच्या वागण्यामुळे धक्का बसला आहे. सदर मुलगी गुरुवारी तिचा ऑनलाईन अभ्यास करत असताना तिला शिक्षिकेने एक प्रश्न विचारला. त्याचे उत्तर तिला देता आले नाही. त्यानंतर त्या महिलेने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान त्या महिलेची दहा वर्षाची मुलगी हे सर्व पाहत होती. तिने याबाबच 1098 या हेल्पलाईनला कळवले. त्यानंतर एनजीओची काही माणसं त्यांच्या घरी आली. त्यावेळी महिलेची चौकशी केली असता तिने उलट सुलट उत्तर दिली.

मात्र एनजीओच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप तिला अटक झालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या