पुत्रप्राप्तीसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन कुटूंबाच्या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, दीर आणि जावेविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लता मंगेश झांबरे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती मंगेश बिभीषण झांबरे, दीर श्रीकांत झांबरे, जावू अर्चना झांबरे (सर्व रा. नऱ्हे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन पंडीत (वय २६, रा.नेकनू, बीड ) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता आणि मंगेश यांचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले होते. त्यानंतर मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन पती मंगेश, दीर श्रीकांत आणि जाव अर्चना लताला मानसिक त्रास देत होत्या. शिवीगाळ आणि त्रासाला कंटाळून लताने राहत्या घरी आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या