आरोग्याच्या समस्येमुळे गर्भवती महिलेची आत्महत्या

1165

औराद शहाजानी येथील भवानी नगरमधील सुनिता बालाजी माकणे या विवाहितेने गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ती दोन महीन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे.

आठ महिन्यांपूर्वीच व्यंकट जाधव यांची मुलगी उदगीर तालुक्यातील शेल्लाळ गावातील सुनिता या मुलीचा औराद येथील बालाजी माकणे या तरुणाबरोबर विवाह झाला होता. गेल्या चार महिन्यांपासुन सुनिताला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे शरीरात अशक्तपणा आल्याने त्यांना चालताना, फिरताना त्रास होत होता. त्यावर उपचारही सुरु होते. सुनिताचा पती बालाजी व वडील दोघेही उदगीर येथून तिच्या उपचारासाठी औषध घेत होते. पती बालाजी व सासरे घरी नसताना सुनिताने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सुनिताने आपण आरोग्याच्या समस्येमुळे आत्महत्या करीत असल्याचे पत्र लिहिले आहे. आत्महत्येसाठी माझे पती व सासु, सासरे जबाबदार नसल्याचे लिहीले आहे. सुनिताने आत्महत्या केल्याचे पाहून सासुने आरडाओरड केल्याच्या आवाजाने शेजारील धावत आले. त्यांनी तिला औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कदम यांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदन करण्यासाठी निलंगा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला.

सुनिताच्या माहेरच्यांनी सुनिताला सातत्याने हुंड्यासाठी त्रास दिला जात होता, असे आरोप केला आहे. त्यामुळे मृतदेह निलंग्याच्या उपजिल्हा रुग्णालयातच आहे. सासरच्या सर्व आरोपींना अटक करूनच शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करावी, असे सुनीताच्या माहेरकडील लोकांचे म्हणणे आहे. यातील दोषींना जोपर्यंत पोलीस ताब्यात घेत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातलगांनी घेतली आहे. सध्या त्यांचे उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी औराद शाहजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंड करीत आहेत.निलंगा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन देऊनही माहेरील लोकांनी गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या