लग्नाच्या दिवशीच वधूने प्रियकरासोबत घेतला गळफास

रविवारी पहाटे सुमारे पाच वाजेच्या दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथे प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे नववधू स्नेहा राजू आव्हाड (18) या तरुणीने अंगावर लग्नाची हळद लागलेली असताना व आज 16 मे रोजी दुपारी स्नेहाचा विवाह होणार होता. मात्र या नववधूने लग्नाच्या दिवशीच आपला प्रियकर नवनाथ सुरेश गायकवाड (21) याच्यासोबत गळफास घेऊन दोघांनीही आपली जीवन यात्रा संपविली. या दुर्दैवी घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नवनाथ सुरेश गायकवाड या तरुणाचे मालखेडा येथे रस्त्यावर टायर पंक्चरचा व्यवसाय होता. नवनाथ याचे त्यांच्याच नात्यातील स्नेहा राजू आव्हाड या तरुणी सोबत वर्षभरापासून प्रेम संबंध जुळले होते. आज दुपारी स्नेहाचा विवाह तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे या तरुणाशी पार पडणार होता. मात्र विवाहाच्याच दिवशी स्नेहा ही नवनाथ सोबत पळून गेली. कोळेगाव येथून भल्या पहाटे दोघेजण मालखेडा येथे आले. त्याठिकाणी असलेल्या नवनाथ याच्या वडीलांचे जुने घर तेथे त्या दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या