
दिवाळीला मुलाकडे राहण्यासाठी गेलेल्या 70 वर्षीय आजीबाईच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी आजीच्या घरातील आठ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.
पूर्वेकडील कोपरी परिसरात राहणाऱ्या आजीबाई यांना चार मुले आहेत. 13 ऑक्टोबरला घरातील साफसफाई करून आजीबाई मुलाच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेल्या. मात्र 30 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करून त्या घरी परतल्यानंतर त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटाच्या लॉकरमधील साडेतीन लाखांचा सोन्याचा हार, चार लाखांचे सोन्याचे तोडे, 20 हजारांचा चांदीचा दंडपट्टा असा एकूण 7 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज घेऊन धूम ठोकली. याप्रकरणी आजीबाईंनी दिलेल्या तक्रारीनुसार कोपरी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला आहे.





























































