लग्नानंतरही पत्नीचा धर्म बदलत नाही

सामना ऑनलाईन । मुंबई

एखाद्या महिलेने दुसऱ्या धर्माच्या पुरुषाशी लग्न केले तरीही तिचा धर्म बदलणार नाही. अशा प्रकारचा कोणताही कायदा देशात अस्तित्वात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले आहे. एका पारशी महिलेच्या प्रकरणात सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा महत्त्वपूर्व निकाल दिला आहे. दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती लग्नानंतरही आपापली धार्मिक ओळख कायम ठेवू शकतात असेही खंडपीठाने म्हटले आहे.

गुलरुख एम. गुप्ता या पारसी महिलेने १९९१ मध्ये वलसाडमधील हिंदू पुरुषाशी विवाह केला होता. गुलरुख यांना वडिलांच्या अंत्यसंस्काराला हजर राहायचे होते. मात्र वलसाड पारसी बोर्डाने त्यांना ‘टॉवर ऑफ सायलेन्समध्ये’ प्रवेश नाकारला होता. याप्रकरणी गुलरुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘लग्नानंतर पतीचा धर्म हाच महिलेचा धर्म होतो’ असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते.

या निर्णयाविरोधात गुलरुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या घटनापीठात दीपक मिश्रा यांच्यासह न्यायमूर्ती ए. के. सीकरी, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि अशोक भूषण यांचा समावेश आहे. या घटनापीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाशी असहमती दर्शवत लग्नानंतर महिलेचे तिच्या पतीच्या धर्मात धर्मांतर होत नाही. आपल्याकडे स्पेशल मॅरेज अॅक्ट आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबरला होणार असून वलसाड बोर्ड ट्रस्टची बाजू ऐकून घेतली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या