अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी एका विवाहित महिलेला अटक

85
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । बंगळुरू

एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका २४ वर्षीय विवाहीत महिलेला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिलेवर पॉक्सो कायद्यांतर्गत अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंगळुरूमधील कोलार गोल्ड फिल्ड परिसरात राहणाऱ्या सदर महिलेचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून तिचे याच परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध सुरु होते. या दोघांना एकमेकांसोबत राहायचे होते मात्र सदर महिलेचे लग्न झालेले असल्यामुळे ते शक्य होत नव्हते. त्यामुळे २४ ऑक्टोबर रोजी ते दोघे घरातून पळून गेले होते. पळून जाताना सदर महिलेने घरातील दीड लाख रुपये चोरले होते.

२४ ऑक्टोबरच्या रात्री सदर महिलेच्या पतीने त्याची बायको बेपत्ता असल्याची तक्रार कोलार गोल्ड फिल्ड परिसरात नोंदविली होती. दुसऱ्या दिवशी त्या मुलाचे वडील देखील त्यात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या मुलाच्या वडीलांनी त्या महिलेचा फोटो पोलिस ठाण्यात बघितला तेव्हा त्यांना कळले की ती महिलाही बेपत्ता आहे. हि माहिती मिळाल्यानंतर त्या मुलाच्या वडीलांनी सदर महिलेनेच आपल्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार नोंदविली.

त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या, मुलाच्या इमारतीतील व कोलार गोल्ड फिल्ड बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा ते दोघे एकत्र आंध्र प्रदेशच्या बसमध्ये चढताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा व मुलाचा मोबाईल ट्रॅक करून त्यांचे लोकेशन तपासत होते. मात्र ते दोघेही पोलिसांना चकमा देऊन पळून जायचे. अखेर त्या दोघांना वेलाकन्नी येथील एका हॉटेलमधून अटक केली. अटक केल्यानंतर त्या दोघांना बंगळुरूला आणण्यात आले.

त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतरही ते दोघे एकमेकांसोबत राहायचे म्हणून पोलिस ठाण्यात गोंधळ घालत होते. अल्पवयीन मुलाला पळवून नेणे हा गुन्हा असल्याचे देखील सदर महिलेला पटत नव्हते. अखेर त्या महिलेला अटक केले तेव्हा तिला तिचा गुन्हा समजला दरम्यान त्या मुलाची वैद्यकीय तपासणी केली असता त्या दोघांमध्ये शारिरिक संबंध आल्याचे समोर आले. त्यामुळे त्या महिलेवर अपहरणासोबत बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे. असे कोलार गोल्ड फिल्ड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या