वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या महिलेसह पुरुषाला अटक, तुरुंगात रवानगी

कोरोना संकटातही जीवाची परवा न करता इमानेइतबारे नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांनाच बेजबाबदार लोकांकडून त्रास होऊ लागला आहे. काळबादेवी परिसरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणाऱ्या कॉन्स्टेबलला एका महिलेने भरचौकात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. कारवाई केल्याच्या रागातून महिलेने पोलिसावर हल्ला चढवला.

काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत असलेले एकनाथ पारठे गुरुवारी दुपारी कॉटन एक्सचेंज नाका येथे वाहतूक व्यवस्था सांभाळत होते. त्यावेळी मोहसीन निजामुद्दीन खान (32) हा तरुण विना हेल्मेट तेथून जात असताना पारठे यांनी त्याला थांबवले व कारवाई केली. पण मोहसीनने दंड भरण्यास नकार देत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या सोबत दुचाकीवर बसलेली सागरिका तिवारी ही महिला संतापली आणि पारठे यांच्या अंगावर धावून गेली.

त्यानंतर सागरिकाने पारठे यांच्या वर्दीची कॉलर पकडून त्यांना थेट मारण्यास सुरुवात केली. भरचौकात तिने पारठे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. इतक्यावर न थांबता तिने पारठे यांच्या शर्टचे बटण तोडले तसेच नोकरी घालविण्याची धमकी दिली.

नागरिकांची बघ्यांची भूमिका

हा प्रकार सुरु असताना अन्य नागरिक बघ्याच्या भुमिकेत होते. तर मोहसीन मोबाईलवर मारहाणीचा व्हिडीओ काढत होता. याप्रकरणी पारठे यांनी तक्रार दिल्यानंतर लो.टि. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मोहसीन आणि सागरिका यांना अटक केली.

महिलेचा उलटा कांगावा

कारवाई करताना पारठे ‘सर आणि मॅडम’ बोलून नम्रपणे दोघांशी बोलत होते. पण तरी देखील सागरिका हिने धक्काबुक्की व शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. असे होत असताना पारठे यांनी संयम ठेवत नम्रपणे बोलणे सुरू ठेवले. मात्र पोलिसाने अपशब्द वापरल्याचा खोटा कांगावा महिलेने केला. त्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या