बापरे! महिलेने उशीच्या कव्हरमध्ये पकडला साप

34

सामना ऑनलाईन। न्यूयार्क

घरातील भिंतीवर एखादी पाल सरपटताना दिसली तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. पण अमेरिकेतील एका महिलेने झुरळाला घराबाहेर टाकावे तितक्या सहजपणे चक्क ५ फूट लांब सापाला उशीच्या कव्हरमध्ये पकडले आणि घराबाहेर सोडून दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल झाला असून महिलेच्या साहसाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

सनशाईन मॅककरी असे या महिलेचे नाव असून ती एक टॅटू आर्टिस्ट आहे. ती अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये राहते. १ जून रोजी घर साफ करताना तिला पलंगाखाली एक भलामोठा काळा साप आरामात पहुडलेला दिसला. सापाला बघताच हादरलेल्या सनशाईनने घरातून बाहेर पळण्याचा विचार केला. पण स्वतःच्या घरातून पळण्यापेक्षा सापालाच घराबाहेर काढायला हवे असे तिला वाटले. मात्र त्याला बाहेर कसे काढावे हेच तिला सुचत नव्हते. शेवटी तिने हिंमत केली. पलंगावरील उशीचे कव्हर काढले व त्याचा खोळ करुन तीने ते सापाच्या तोंडावर टाकले. शरीरावर कापड पडताच साप हालचाल करु लागला. त्याचवेळी सनशाईनने पटकन सापाला त्या कापडात गुंडाळले व ती सरळ घराबाहेर गेली. त्यानंतर तिने सापाला बाहेरच्या झाडात सोडले.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिने फेसबुकवर पोस्ट केला आहे. आताच घरात ५-६ फूट लांब साप बघितल्याचे तीनं या पोस्टमध्ये म्हटले आहे. अद्यापपर्यत ३७ हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून ८ हजाराहून अधिक जणांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पाहा व्हिडिओ :

आपली प्रतिक्रिया द्या