५० लाखांच्या खंडणीसाठी ‘तिने’ रचला ऑडिओ क्लीपचा बनाव

कल्याणच्या व्यावसायिकास धमकावणारी महिला पोलिसांच्या ‘ट्रेप’मध्ये

सामना प्रतिनिधी । ठाणे

रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या कथित खंडणीची ऑडिओ क्लीप काही दिवसांपूर्वी गाजली असतानाच आता कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कुलकर्णी यांनाही ऑडिओ क्लीपचा बनाव रचून एका महिलेने ब्लॅकमेलिंग केल्याचे उघडकीस आले आहे. माझ्याकडे संभाषणाचे रेकॉर्डिंग असून ५० लाख रुपये दे… नाहीतर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन, अशा धमकी देणाऱ्या खंडणीखोर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सुषमा दाते असे या महिलेचे नाव असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे. आतापर्यंत अनेकांना ब्लॅकमेलिंग करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दाते यांच्यामागे कोण गॉडफादर आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

कल्याणमधील कर्णिक रोड येथे राहणारी सुषमा दाते ही महिला मिलिंद कुलकर्णी यांच्या कार्यालयात १४ वर्षांपूर्वी क्लार्क म्हणून काम करीत होती. मात्र तिचे काम समाधानकारक नसल्याने वर्षभरातच तिला काढून टाकले. तरीही वारंवार फोन करून मला पुन्हा कामावर घेतले नाही, त्याचा राग म्हणून सुषमा दाते हिने वर्षभर कुलकर्णी यांना एसएमएस तसेच फोनवरून मानसिक त्रास दिला. तुमची ऑडिओ क्लीप माझ्याकडे असून ५० लाख रुपये द्या नाही तर मी ती व्हायरल करेन अशी धमकीच दिली.

… आणि तिला पकडले
सुषमा दाते हिच्या वारंवारच्या धमक्यांमुळे बांधकाम व्यावसायिक मिलिंद कुलकर्णी यांच्या कुटुंबास प्रचंड धक्का बसला. कुलकर्णी हे कल्याणमधील सामाजिक, साहित्यिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत असून अनेक संस्थांचे पदाधिकारी आहेत. उत्कृष्ट मराठमोळे बांधकाम व्यावसायिक म्हणून रोटरी क्लबने त्यांचा जागतिक पातळीवर गौरव केला आहे. दाते या महिलेच्या वारंवार धमक्यांना कंटाळून त्यांनी अखेर महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खंडणीविरोधी पथकाने सापळा लावला आणि २० लाख रुपये देताना सुषमा दाते या महिला डॉनला पकडले.

पाळेमुळे शोधून काढणार
बलात्काराची धमकी देत व्यावसायिकांना लुटणारी मोठी टोळीच कार्यरत असून सुषमा दाते हिचा पाळेमुळे शोधण्याचा निर्धार खंडणीविरोधी पथकाने केला आहे. कोणाच्या सांगण्यावरून धमक्या दिल्या त्या गॉडफादरलाही शोधणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान ब्लॅकमेलर सुषमा दाते हिला उद्या कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या