मालवण ‘स्वाईन फ्लू’ने महिलेच्या मृत्यू

15

सामना प्रतिनिधी । मालवण

कुंभारमाठ येथील मारीस्ट्रेला जॉनी फर्नांडिस वय ३९ या विवाहितेचा स्वाईन फ्लूमुळे सोमवारी गोवा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यू नंतर आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेले सोळा दिवस फर्नांडिस यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. मालवण रोझरी चर्च परिसरात शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१० एप्रिलला वैभववाडी नावळे येथील रोहिणी रोहन सावंत-गुरव यांचा कोल्हापूर येथे स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुंभारमाठ येथील फर्नांडिस यांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. सावंतवाडीत दोन मुलांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यांच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार झाले. यामुळे वैभववाडी, सावंतवाडी परिसरातील स्वाईन फ्लूने मालवणपर्यंत पाय पसरले आहेत.

फर्नांडिस यांना ताप आल्याने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून तत्काळ गोवा येथे उपचारासाठी हलविले. त्यांना स्वाईन फ्लू झाल्याची माहिती जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेस दिली होती. मात्र आरोग्य विभागाचा एकही अधिकारी, कर्मचार्‍याकडून याबाबतची विचारणा झाली नाही. फर्नांडिस यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र काल त्यांचा मृत्यू झाला.

फर्नांडिस यांचा बंदरजेटी येथे थंडपेय विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायातून त्यांनी बर्‍याच वर्षानंतर घर बांधण्याचे स्वप्न साकारले. गेल्यावर्षी ते नव्या घरात दाखल झाले. फर्नांडिस यांना अचानक तापाची लागण झाल्याने त्यांचा व्यवसाय गेले काही दिवस बंद होता. आजारपणातच फर्नांडिस यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने फर्नांडिस कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागले. असे सांगण्यात आले. शासन स्तरावरून कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे. क्रिकेटपटू आणि बंदरजेटी येथील व्यावसायिक जॉनी फर्नांडिस यांची ती पत्नी होय. त्यांच्यामागे दोन लहान मुली, सासू, दीर, भावजय असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या