टिकटॉकमुळे जातीयवादही भडकू शकतो! हायकोर्टात याचिका दाखल

669

सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणाऱ्या ‘टिकटॉक’ (TikTok) या चायनीज अॅपवर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. या अॅपने अनेकांना ‘स्टार’ बनविले असले तरी टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होत आहेत, यामुळे या अॅपवर बंदी घाला, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

टिकटॉक मोबाईल अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिना दरवेश या मुंबईतील गृहिणीने टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ‘टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, देशात जातीयवाद भडकू शकतो. देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन होत आहे’, असा आरोप दरवेश यांनी आपल्या याचिकेत केला आहे. लवकरच या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

TikTok आहे तरी काय…

‘टिकटॉक’ (TikTok) हे एक चायनीज अॅप आहे. या अॅपच्या मदतीने स्मार्टफोन युझर्स छोटे व्हिडीओ बनवून शेअर करू शकतात. ‘बाइट डान्स’ नामक कंपनीनं 2016 साली हे अॅप लाँच केले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकेत हे अॅप सर्वाधिक डाउनलोड होणारे अॅप ठरले आहे. महत्वाचे म्हणजे, 13 वर्षांवरील व्यक्तीनेच टिक-टॉक अॅप वापरावे असे कंपनीचे सांगणे आहे. मात्र याचे म्हणावे तसे पालन होत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी टिकटॉकवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल असा व्हिडीओ अपलोड केल्याने एका ग्रुपवर कारवाईही करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या