‘विमानोड्डाण क्षेत्रातील मुलींचा दिन’ मुंबईत साजरा

14

सामना ऑनलाईन । मुंबई

वुमन इन एव्हिएशन इंटरनॅशनल (इंडिया चॅप्टर) आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने विमानोड्डाण क्षेत्रातील मुलींचा दिन नुकताच वान्द्रे येथील नॅशनल महाविद्यालयात साजरा करण्यात आला. मुलींनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषय घ्यावेत. या संबंधित विषयातील संधी जाणून घ्याव्यात. तसेच विमानोड्डाण आणि अंतराळ क्षेत्रातील संधी यासंबधीची माहिती मुलींना व्हावी हा यामागील उद्देश होता. हिंदुस्थान सरकारच्या ‘स्कील इंडिया’ या उपक्रमाशी सांगड घालण्याचा सुद्धा हा एक प्रयत्न होता.

वुमन इन एव्हिएशन इंटरनॅशनल (इंडिया चॅप्टर) संस्थेने विविध शाळांतील 100 विद्यार्थिनींना या विमानोड्डाणातील करिअरच्या संधी या सत्रासाठी निमंत्रित केले होते. या सत्रास या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना एअर ट्रॅफिक कंट्रोलर, एअरलाईन डिसपॅच, पायलट, एव्हिएशन मेन्टेनन्स टेक्निशिअन, एअरोनॉटिकल इंजिनीअर आणि एव्हिएशन मॅनेजमेंट आदी संधींबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी वुमन इन एव्हिएशन इंटरनॅशनल (इंडिया चॅप्टर) च्या अध्यक्षा राधा भाटिया म्हणाल्या की, “वुमन इन एव्हिएशन इंटरनॅशनल (इंडिया चॅप्टर) ही संस्था विमानोड्डाणातील मुलींचा दिन साजरा करण्याचे हे तिसरं वर्ष होय. मुंबई मध्येच हा दिन साजरा करताना आणखी आनंद होत आहे. तरुण मुलींनी विमानोड्डाण हे क्षेत्र करिअर म्हणून निवडावे त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिन साजरा करण्यात आला.

जगात सगळ्यात जास्त महिला वैमानिक या हिंदुस्थानातील आहेत. पण त्या व्यतिरिक्त अनेक करिअरचे मार्ग अजूनही अपरिचित आहेत. हा दिन साजरा करण्यासोबत महाराष्ट्रातील मुलींनी विमानोड्डाण क्षेत्रातील अभियांत्रिकी, एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि इतर डझनभर अन्य नोकऱ्याच्या संधी देखील पडताळून पहाव्यात हे आमचं उद्दीष्ट आहे.

या तरुण मुलींना रोल मॉडेल्सची ओळख करुन देणे आणि हसत खेळत मनमोकळ्या वातावरणात या मुलींना शिक्षण मिळवून देण्यासाठी आमचे परिश्रम निरंतर चालू असतील. आम्ही सुदैवी आहोत की या उपक्रमात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि लॉकहीड मार्टीन हे आमचे भागीदार आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रात युवा पिढीने आपले करिअर घडवावे हे त्यांचे प्रयत्न स्तुत्य आहे.” असे देखील भाटिया म्हणाल्या.

हा दिन साजरा करताना विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र आणि या क्षेत्रातील गुंतागुंतीविषयी एक लहान सादरीकरण दाखविण्यात आले. वुमन इन एव्हिएशन इंटरनॅशनल (इंडिया चॅप्टर)च्या मुंबई समन्वयिका आणि अमाडस इंडियाच्या वरिष्ठ व्यवस्थापिका सुजाता मारिवाला यांनी विद्यार्थ्यांसाठी एका प्रश्नमंजुषेचे आयोजन केले होते, काही विद्यार्थ्यांनी यावेळी पारितोषिक पटकाविले.

वुमन इन एव्हिएशन इंटरनॅशनल (इंडिया चॅप्टर) विषयी :

वुमन इन एव्हिएशन इंटरनॅशनल (इंडिया चॅप्टर) ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे. विमानोड्डाणाच्या करिअर मधील महिलांसाठी असणाऱ्या सर्व संधी आणि आवड यांच्यासाठी ही संस्था कार्य करते. इंडिया चॅप्टर विमानोड्डाण आणि अंतराळ क्षेत्रातील महिलांचं नेटवर्किंग, मार्गदर्शन आणि शिष्यवृत्तीच्या संधी आणि करिअरच्या संधी याविषयीचं कार्य करते.

आपली प्रतिक्रिया द्या