प्रेमसंबंधात अडथळे नको म्हणून महिलेने केली पोटच्या मुलीची हत्या

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या प्रेमसंबंधात बाधा येऊ नये म्हणून प्रियकराच्या मदतीने आपल्या पाच वर्षाच्या मुलीला ठार करून विहिरीत फेकून दिले.

डलमऊ कोतवाली परिसरातील बलभद्रपूर गावातील संतोष कुमार याची पत्नी आपल्या पाच वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन होळीकरिता माहेरी गेली होती. 31 मार्च रोजी ती तिच्या सासरी परत आली. पण तेव्हा तिच्यासोबत मुलीला न आणता ती एकटीच आली. तेव्हा सासरकडच्यांनी तिच्याकडे मुलीविषयी विचारणा करून मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली.

तरीही मुलगी सापडत नव्हती म्हणून त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. तेव्हा पोलिसांना तिचे प्रेत बलभद्रपूर गावापासून 500 किमी. दूर अंतरावर असलेल्या एका विहिरीत सापडले.

या प्रकाराविषयी पोलिसांनी मुलीच्या आईकडे चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की, गेल्या एक वर्षापासून तिचे माहेरकडच्या एका व्यक्तिसोबत प्रेमसंबंध सुरू होते. माहेरी आल्यावर दोन दिवस ती त्याच्यासोबत राहात होती. तसेच घरी गेल्यावर याविषयी वडिलांना सांगणार असे तिची अल्पवयीन मुलगी तिला म्हणत होती. त्यामुळे कोणालाही या प्रेम प्रकरणाबाबत काहीही कळू नये म्हणून प्रियकराने आणि आरोपी महिलेने मुलीला ठार करून तिचे प्रेत गावात खूप दूरवर असलेल्या विहिरीत फेकून दिले.

या घटनेनंतर रायबरेली येथील पोलीस अधीक्षक श्र्लोक कुमार यांनी मुलीचे प्रेत त्यांच्या पथकाच्या मदतीने विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनाकरिता पाठवले आहे. तसेच आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या