पावसासाठी वडवळच्या महिलांनी ग्रामदैवत वटसिध्द नागनाथाला कोंडले पाण्यात

सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ

वडवळ नागनाथ येथील परिसरातील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. दिवसेंदिवस दुष्काळाची छाया गडद होऊन शेतकऱ्यांसह नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. या भयावह दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात यासाठी येथील सरपंच शिल्पा बेंडके यांच्या पुढाकाराने गावातील शेकडो महिलांनी ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथाला पाण्यात कोंडले.

अर्धा पावसाळा संपून गेला तरीही वडवळ नागनाथ आणि परिसरात अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाही यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबलेल्याच आहेत. या भागात आता दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पाऊस पडावा म्हणून मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी वडवळचे ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरात सरपंच शिल्पा बेंडके यांच्या पुढाकाराने गावातील शेकडो महिलांनी, पुरुषांनी डोक्यावर घागरीने पाणी आणून मंदिरातील स्वयंभू महादेवाच्या पिंडीला पाण्यात कोंडून ठेवले आहे.

यावेळी ‘ओम नमः शिवाय’ चा गजर करून उपस्थित महिलांनी नवसाला पावणाऱ्या जागृत वटसिद्ध नागनाथांकडे पाऊस पडावा यासाठी प्रार्थना केली. दरम्यान आज सकाळी गावातून महिलांनी वाजत गाजत बँडच्या निनादात ‘ओम नमः शिवाय’ चा जयघोष करीत गावातील मारोती मंदिर, गणपती मंदिर, श्रीराम मंदिर, लक्ष्मी मंदिर, श्रीदेवी मंदिरातील देव देवतांचा जलाभिषेक केला. यासाठी भरत फुलारी, गंगाधर वडिले, राजकुमार बेरकिळे, गिरीधर भेटे, राजकुमार आष्टके, बालाजी गंदगे, बाबुराव गंदगे, वसंत रेड्डी, राजकुमार मोतीपवळे, संतोष वडिले, राजकुमार फुलारी, मनोहर कल्याणे यांच्यासह अनेक महिलांनीही पुढाकार घेतला. याशिवाय परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन ओल्या कपड्यांनी वेगवेगळ्या गावच्या मारुतीला जलाभिषेक घालण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. पाऊस पडून दुष्काळ हटावा यासाठी शनिवारी येथील प्रसिद्ध संजीवनी वनौषधी बेटावरील हनुमान मंदिरात ग्रामस्थांनी जलाभिषेक करीत भोजनाचेही आयोजन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या