पोलीस महानिरीक्षकांसमोर महिला कर्मचाऱ्यांचा बांध फुटला

20

सामना प्रतिनिधी । बीड

बीड पोलीस प्रशासनाच्या बेशिस्तपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्यासमोर हा प्रकार घडला. पुरूष कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नाहीत, अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देतात, रजा दिली जात नाही अशा तक्रारी करताना महिला कर्मचाऱ्यांना अक्षरश: रडू आले. या तक्रारीनंतर गृहखात्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी भांरबे यांनी पोलीस प्रशासनाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत बीड पोलिसांमधील ही धुसफूस उघड झाली. पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी थेट भारंबे यांच्यासमोरच आपली कैफियत मांडली. यावेळी पुरूष कर्मचारी आपल्याला सहकार्य करत नाहीत. वरिष्ठ अधिकारी त्रास देतात, तसेस अडचणी असतानाही रजा दिली जात नाही अशी तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी काही कर्मचाऱ्यांना अक्षरश: रडू कोसळले.

या गंभीर तक्रारीनंतर भारंबे यांनी बैठकीत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. ‘खांद्याला खांदा लावून काम करा, बेशिस्त वागणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलीस प्रशासनच जर बेशिस्त झाले तर समाज कुणाचा आदर्श घेणार ? प्रशासनात काम करत असताना वैयक्तिक हेवेदावे करू नका आणि वैयक्तिक वादातून तक्रारीही करू नका अशा सूचना भारंबे यांनी दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या