माहिम चर्चमधील महिला वॉशरूममध्ये आढळला सीसीटीव्ही कॅमेरा

74

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील सर्वात जुन्या चर्चच्या महिला वॉशरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहिमच्या सेंट मायकल चर्चमधील हा प्रकार आहे, अशी बातमी मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिली आहे. आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड गेसियस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून याबाबत चर्चला पत्र पाठवून विचारणा केली आहे.

मुंबई मिररच्या वृत्तात म्हटल्यानुसार, ‘सेंट मायकलमधील पादरींना याबद्दल जाब विचारायला हवा. सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांना काय कॅप्चर करायचे आहे? इथल्या पादरींना काय पाहायचं आहे?, असा संतप्त सवाल असोसिएशन ऑफ कन्सर्न्ड कॅथलिक्सचे उपाध्यक्ष केरेन सी डिसूजा यांनी केला आहे. तसंच त्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत चर्चला पत्र पाठविले आहे.

महिलांच्या एकांततेचं हे उल्लंघन आहे. पादरींनी जागं व्हायला हवं. महिलांचा आदर व्हावा. लाइव्ह पोर्न पाहण्यासाठी येथे गर्दी व्हावी, असं आम्हाला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी पत्रातून लगावला आहे.

पोर्तुगीजांनी १५३४ मध्ये माहिम येथे हे चर्च बांधण्यात आले होते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी चर्चमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. पण नको तिथे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जर बाथरूममध्येही चोरी होऊ शकते असे वाटत असेल तर मग वॉशरूमच्या ५० मीटर परिसरातही सुरक्षा रक्षक तैनात करायला हवेत, असं ही डिसूजा म्हणाले.

माहिममधील बी. डि. डिसूजा या नियमितपणे चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येतात. त्यांनीही या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आक्षेप घेतला आहे. कॉरिडोरमध्ये कॅमेरे लावणे योग्यच आहे. पण वॉशरूममध्ये कॅमेरे लावणे तसंच वॉशरूममध्ये असताना कोणीतरी तुम्हाला पाहताहेत हेच खूप धक्कादायक आहे. यामागचा उद्देश काय आहे हे माहित नाही. पण हा खासगी जीवनाचा भंग आहे असं, बी.डि. डिसूजा म्हणाल्या. तसेच याआधी देखील अनेकांनी याबाबत आवाज उठवला होता.

सेंट मायकल चर्चचे पादरी सिमॉन बोगर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सेक्युरिटी फिचर्स चोरी होण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. टॉयलेटच्या बेसिनजवळ हे कॅमेरे लावले आहेत. केवळ महिलांच्या सुरक्षेसाठी हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याबाबत अद्याप कुणी तक्रार केलेली नाही. जर याबाबत कोणीची काही तक्रार असेल तर त्यांचे समाधान केलं जाईल, असं ही ते म्हणाल्याचे या इंग्रजी दैनिकात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या