लग्नाचा बहाणा करून महिलेला विकले परदेशात, मिरजेत चौघांवर गुन्हा दाखल

1018

सातार्‍यात एका महिलेला लग्नाचा बहाणा करून तिला चक्क पाच लाख रुपयांना परदेशात विकले आहे. या प्रकाणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलोफर शेख या 32 वर्षीय महिलेचा विवाह 2003 मध्ये मिरज येथे झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. मात्र, काही वर्षांनंतर निलोफर यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर निलोफर आपल्या मुलांसोबत मिरज येथेच स्वतंत्र राहू लागल्या. त्यांच्या भावजयीच्या घराजवळ राहणार्‍या समीर नदाफ, त्याची आई राहमत, बहीण आरिफा व तिचा पती महम्मद यांनी सदर महिलेला सांगितले की, महम्मद शेख यांचा बहरिन देशातील मित्र अब्दुलहुसेन अलि इब्राहिम यांची पत्नी वारली असून त्याचा दुसरा विवाह करायचा आहे. त्याच्यासाठी आम्हाला निलोफर आवडली आहे. तो तिचा मुलांसह स्वीकार करेल. दुसर्‍या लग्नाची चर्चा करण्यासाठी निलोफर ही भावजयीसोबत सातार्‍यात आली. घरातल्यांशी चर्चा केल्यानंतर नदाफ कुटुंबीयांना सातार्‍यात बोलावण्यात आले. त्यावेळी त्यांनी अब्दुलहुसेन हा बहरिन येथे पुढच्या आठवड्यात जाणार आहे. त्यापूर्वीच त्याचे लग्न करायचे आहे. तो चांगला असून आम्ही हमी देतो, असे त्यांनी निलोफरला सांगितले. त्यामुळे तिने लग्नास संमती दर्शवली.

24 मार्च 2019 रोजी निलोफरचे अब्दुल हुसेन याच्याशी सातार्‍यात लग्न झाले. लग्नानंतर तिचा पासपोर्ट व विजा नसल्याने निलोफरला मिरज येथील समीर नदाफ याच्या घरी राहण्यासाठी नेले. तेथे गेल्यानंतर समीरच्या घरी न नेता दुसरीकडे नेले. पाच दिवसांनंतर अब्दुलहुसेन याने निलोफरला सातार्‍यात आईकडे आणून सोडले. त्यानंतर तो बहरिनला निघून गेला. काही दिवसांनंतर निलोरला त्यांनी विजा पाठवून दिला. 1 जुलै 2019 रोजी निलोफर एकटीच विमानाने बहरिनला गेली. तेथे गेल्यानंतर अब्दुल हुसेन याने तिला घरी नेले. घरात गेल्यानंतर तेथे अगोदरच तीन महिला होत्या. त्यांची भाषा निलोफरला समजत नव्हती.

दोन दिवसांनंतर अब्दुल हुसेन इब्राहिम याने निलोफरला कामासाठी बाहेर नेले. तेथील ऊन सहन होत नसल्याने निलोफरने कामास नकार दिला. त्यावेळी अब्दुल हुसेन याने ‘तुला मी पाच लाख रुपयांना समीर व त्यांच्या नातेवाईकांकडून विकत घेतले आहे. त्यामुळे तुला काम करावेच लागेल,’ असे त्याने सांगितले. आपल्याला लग्नाचा बहाणा करून विकले असल्याचे निलोफरला समजल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली.

बहरिन देशातील एका महिलेच्या मोबाईलवरून निलोफरने सातार्‍यात आईला फोन केला. हा सारा प्रकार आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने बहरिन येथे राहणार्‍या संबंधित महिलेच्या मोबाईलवर विमानाचे तिकिट पाठविले. त्या महिलेच्या मदतीने निलोफर ही 23 जुलै 2019 रोजी गुपचुपणे बहरिनमधून अबुधाबी येथून मुंबईत आली. त्यानंतर ती सातार्‍यात सुखरुप पोहोचली. प्रकृती बरी नसल्यामुळे तिला तक्रार देण्यास उशीर झाला. निलोफरने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी समीर बादशहा नदाफ, हमत बादशहा नदाफ, आरिफा बादशहा नदाफ, महम्मद शेख यांच्या विरोधात तर बहरीन देशात राहाणार्‍या अब्दुल हुसेन अली इब्राहिम विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या