महिला टी-20 विश्वचषक : हिंदुस्थानी संघ भिडणार बांगलादेशला

602

सलामीच्या विश्वचषक लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला हिंदुस्थानी महिला संघाने पराभवाचे पाणी पाजले होते. त्यामुळे उंचावलेल्या मनोधैर्यानें टीम इंडिया ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी -20 विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या साखळी लढतीत बांगलादेशला भिडणार आहे. बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक हिंदुस्थानी संघ करणार नाही. याच संघाने 2018 मध्ये बलाढ्य हिंदुस्थानला दोनदा पराभवाचा धक्का दिला आहे.

पर्थमध्ये यंदाच्या महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघाला पराभूत करीत स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवण्याचे हिंदुस्थानी संघाचे लक्ष्य आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्मा आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज टीम इंडियाच्या संघात नव्हत्या. यंदा त्यांना आपला धडाका दाखवत बांगलादेश विरुद्धच्या मागच्या पराभवाचे उट्टे फेडण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शिवाय पहिल्या लढतीत विशेष फॉर्मात नसलेली कर्णधार हरमनप्रीत कौर आणि महाराष्ट्राची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना याना सूर गवसल्यास हिंदुस्थानी संघाला सलग दुसरा विजय मिळवणे कठीण होणार नाही.

फलंदाजीत सुधारणा आवश्यक
गेल्या काही स्पर्धांमध्ये हिंदुस्थानी महिला संघाच्या हरमनप्रीत आणि स्मृती मंधाना या प्रमुख फलंदाजांना विशेष कामगिरी नोंदवता आलेली नाही. यंदा सलामीच्या विश्वचषक लढतीतही त्या दोघी अपयशी ठरल्या होत्या. दीप्ती शर्माने 46 चेंडूंत 49 चेंडूची खेळी साकारत हिंदुस्थानी धावसंख्येला चांगला आकार दिला होता. अन्यथा सव्वाशे धावांचा पल्लाही संघासाठी कठीण होता.त्यामुळे हिंदुस्थानी महिलांना स्पर्धेत आपला फलंदाजीचा दर्जा खूपच उंचावावा लागेल. अन्यथा या स्पर्धेत त्यांची डाळ शिजणार नाही. मात्र, नवोदित जेमिमा आणि शेफाली यंदा चांगल्याच फॉर्मात आहेत ही हिंदुस्थानी संघासाठी दिलासा देणारी बाब आहे. हरमनप्रीत, स्मृती यांच्या कामगिरीकडेही हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांचे लक्ष लागलेले असेल.

पूनम ,शिखा पांडेंवर गोलंदाजीत मोठी आशा
ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी उध्वस्त करणारी डावखुरी फिरकीपटू पूनम यादव आणि मध्यमगती गोलंदाज शिखा पांडे यांनी चमकदार कामगिरी करावी अशी अपेक्षा हिंदुस्थानी चाहते करीत आहेत. गोलंदाज भरात आले तर हिंदुस्थानी संघासाठी पुढच्या सर्व साखळी लढती सोप्या ठरतील एवढे मात्र निश्चित.

बांगलादेशच्या या खेळाडूंना रोखणे महत्वाचे
प्रतिस्पर्धी संघाची सलामीची फलंदाज फरगाना हक आणि अष्टपैलू जहांनारा आलम यांच्यासह अनुभवी खेळाडू कर्णधार सलमा खातून यांना नियंत्रणात ठेवणे हिंदुस्थानी संघाला जमले तर संघाचा दुसरा विजय निश्चित आहे. कारण टी-20 त शतक साकारणारी फर्गन हक हिंदुस्थानसाठी धोकादायक ठरू शकते.

स्पर्धेतील संघ –
हिंदुस्थान : हरमनप्रीत कौर (कर्णधार ), स्मृति मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, शेफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक ), हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड़, ऋचा घोष, वेदा कृष्णमूर्ति, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर।

बांगलादेश : सलमा खातून (कर्णधार ), रूमाना अहमद, आयशा रहमान, फहीमा खातून, फरगना हक, जहानारा आलम, ख़दीजा तुल कुबरा, सोभना मोस्तरी, मुर्शीदा खातुन, नाहिदा अख्तर, निगार सुल्ताना (यष्टीरक्षक ), पन्ना घोष, ऋतु मोनी, संजीदा इस्लाम, शमीमा सुल्ताना

आपली प्रतिक्रिया द्या