हिंदुस्थानी महिलांचा सलग दुसरा विजय; बांगलादेशवर 18 धावांनी दमदार विजय

235
PERTH, AUSTRALIA - FEBRUARY 24: Poonam Yadav of India celebrates the wicket of Fahima Khatun of Bangladesh during the ICC Women's T20 Cricket World Cup match between India and Bangladesh at WACA on February 24, 2020 in Perth, Australia. (Photo by Paul Kane/Getty Images)

हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाचा टी-20 वर्ल्ड कपमधील झंझावात सोमवारीही सुरूच राहिला. सलामीच्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर हिंदुस्थानने दुसऱया लढतीत बांगलादेशवर 18 धावांनी दमदार विजय मिळवून चार गुणांसह ‘अ’ गटामध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली. हरमनप्रीत कौरच्या हिंदुस्थानी संघाने उपांत्य फेरीत धडक मारण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून आता न्यूझीलंड व श्रीलंका यांच्याविरुद्ध लढती होणे बाकी आहेत. बांगलादेशला स्पर्धेतील पहिल्याच लढतीत हार सहन करावी लागली.

  • हिंदुस्थानची 16 वर्षीय सलामीवीर शफाली वर्मा हिने अवघ्या 17 चेंडूंत चार खणखणीत षटकार व दोन शानदार चौकारांसह 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. तिचीच प्लेयर ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली.

पूनम यादव पुन्हा चमकली

हिंदुस्थानने बांगलादेशसमोर 143 धावांचे आव्हान ठेवले, मात्र त्यांना 20 षटकांमध्ये 8 बाद 124 धावाच करता आल्या. निगार सुल्तानाने 35 धावांची तर मुर्शिदा खातूनने 30 धावांची खेळी साकारली, पण त्यांना बांगलादेशला विजय मिळवून देता आला नाही. लेगस्पिनर पूनम यादव पुन्हा एकदा हिंदुस्थानसाठी धावून आली. पहिल्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱया पूनम यादवने याही लढतीत तीन फलंदाज बाद केले. तिने 18 धावा देऊन तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शिखा पांडे व अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या