19 वर्षांखालील महिलांचा क्रिकेट वर्ल्ड कप; हिंदुस्थानी युवती अंतिम फेरीत, जगज्जेतेपदासाठी इंग्लंडशी झुंज

आज 19 वर्षांखालील महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करून अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसरीकडे इंग्लंडने थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियावर अवघ्या तीन धावांनी मात करीत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे रविवारी 19 वर्षांखालील महिलांच्या पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदासाठी हिंदुस्थान- इंग्लंड झुंज होईल.

आज हिंदुस्थानच्या विजयात श्वेता सेहरावतची धडाकेबाज फलंदाजी आणि पार्शवी चोप्राच्या अचूक गोलंदाजीमुळे हिंदुस्थानचा विजय सोपा झाला आणि 15 व्या षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले. 20 धावांत 3 विकेट टिपणारी पार्शवी चोप्रा सामन्याची मानकरी ठरली.

  सेनविस पार्क मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानी गोलंदाजांच्या अचूक माऱयापुढे न्यूझीलंडचे फलंदाज तगच धरू शकले नाहीत. हिंदुस्थानी गोलंदाजांनी सुरुवातीपासून दिलेल्या धक्क्यांमुळे न्यूझीलंड 20 षटकांत 9 बाद 107 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पार्शवी चोप्राने 20 धावा देत 3 विकेट टिपल्या.

मग न्यूझीलंडने दिलेले 108 धावांचे आव्हान हिंदुस्थानने 2 गडी गमावून 14.2 षटकांतच पार केले. सलामीवीर श्वेता सेहरावतने 45 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद 61 धावांमुळे हिंदुस्थानला विजय मिळवून दिला.