हिंदुस्थानच्या चार बॉक्सर्स उपांत्य फेरीत, मेरी कोमचा इतिहास

444
mary-kom

हिंदुस्थानचा जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील झंझावात गुरुवारीही सुरूच राहिला. दिग्गज खेळाडू मेरी कोम हिच्यासह चार बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत धडक मारून चार पदके निश्चित केली. मेरी कोमने उपांत्य फेरीत प्रवेश करून आठवे पदक पक्के करून नवा इतिहास रचला. या स्पर्धेत आठ पदक जिंकणारी ती पहिलीच खेळाडू ठरणार आहे. मेरी कोमसह मंजू राणी, लव्हलीना बोर्गोहेन व जमुना बोरो यांनीही उपांत्य फेरीत घोडदौड करून पदके निश्चित केली.

मेरी कोमने 51 किलो वजनी गटात कोलंबियाच्या वॅलेंसिया व्हिक्टोरियाला 5-0 अशा फरकाने धूळ चारली आणि अंतिम चारमध्ये एण्ट्री मारली. मंजू राणीने 48 किलो वजनी गटात गेल्या वेळची कास्य पदक विजेती उत्तर कोरियाच्या किम मी हिला 4-1 असे पराभूत केले.

जमुना बोरो हिने 54 किलो वजनी गटात जर्मनीच्या उरसुला गॉटलॉबला 4-1 अशा फरकाने, तर लव्हलीना बोर्गोहेन हिने 69 किलो वजनी गटात पोलंडच्या कॅरोलिना कोसझेवास्का हिला 4-1 अशा फरकाने नमवले. कविता चाहल हिला पराभवाचा सामना करावा लागला. हिंदुस्थानच्या पाचपैकी चार बॉक्सर्संनी आगेकूच केली.

फेलिक्सला टाकले मागे

मेरी कोमने जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील आठवे पदक पक्के करून फेलिक्स सॅवोनच्या सात पदकांना लीलया मागे टाकले. या स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याच्या शर्यतीत तिने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. कॅटी टेलर हिने महिला विभागात या स्पर्धेत सहा पदके जिंकली होती. येत्या शनिवारी उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या