महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून, टीम इंडियाच जेतेपदासाठी फेव्हरिट

बांगलादेशमध्ये उद्या शनिवारपासून महिलांच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुरुषांच्या स्पर्धेपाठोपाठ 21 दिवसांनंतर महिलांच्या आशिया कपचे सामने रंगणार आहेत. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले. याच मैदानावर हिंदुस्थान आणि श्रीलंका महिला संघांमध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाही ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेत सहावेळचा चॅम्पियन हिंदुस्थानी महिला संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. कारण महिला टीम इंडियाची यजमान बांगलादेशातील मैदानावर कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. या ठिकाणी हिंदुस्थानी संघाच्या नावे 60 टक्के सामने जिंकल्याची नोंद आहे. महिला टीम इंडियाने आतापर्यंत सहावेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.

– यूएई महिला संघ यंदा आशिया चषक स्पर्धेत पदार्पण करणार आहे. टीम पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. स्पर्धेत हिंदुस्थानसह गत चॅम्पियन आणि यजमान बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया, थायलंड व यूएई संघ सहभागी झाले आहेत.

– बहुचर्चित हिंदुस्थान आणि पाकिस्तान संघांतील लढत शुक्रवार, 7 ऑक्टोबरला खेळवली जाणार आहे. या लढतीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिलेले आहे.

हिंदुस्थानच्या लेकींचा जगात दबदबा

हिंदुस्थान या स्पर्धेत सर्वात मजबूत संघ मानला जात आहे. कारण संघातील पाच महिला क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतलेली आहे. डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना ही आयसीसी फलंदाजी क्रमवारीत दुसऱया, शेफाली वर्मा सहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजीमध्ये रेणुका सिंग टॉप-10 मध्ये आहे. दीप्ती शर्माने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतील टॉप-10 मधील स्थान कायम ठेवले. या तुलनेत इतर संघांच्या फक्त चारच खेळाडू टॉपच्या यादीत आहेत.