नाशिक पोलीस आयुक्तांचा स्त्रीशक्तीला सलाम

64
ladies-police
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना ऑनलाईन, नाशिक

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सक्षमपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. आयुक्तालयातील स्त्रिशक्तीने भव्य मोटारसायकल रॅली काढून ‘वाहतूक नियमांचे पालन करा, हेल्मेट वापरा’ असा नाशिककरांना संदेश दिला. स्त्रिशक्तीने नेमबाजी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपले कौशल्य सिद्ध केले. वरिष्ठांनी आपल्या कार्याची दखल घेतल्याने प्रोत्साहन मिळाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात यंदा प्रथमच स्त्रिशक्तीच्या कार्याचा गौरव करणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयुक्तालयाची इमारत गुलाबी रंगाच्या विद्युत रोषणाईने झळाळून निघाली होती. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांद्वारे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयुक्तालयातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढली.

डॉ. सिंगल यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. हेल्मेट परिधान केलेल्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यात सहभागी झाले होते. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा, असा संदेश त्यांनी शहरवासीयांना दिला. दुपारी नेमबाजी स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ‘जागर स्त्रिशक्तीचा’ या कार्यक्रमात पोलीस दलासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.

महिला सक्षम आहेत

आज सर्वच क्षेत्रात महिला उत्कृष्ट काम करीत आहेत. महिला दुर्बल नाहीत तर त्या सक्षम आहेत, ही प्रतिमा समाजासमोर येणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे, या उद्देशाने आयुक्तालयात महिला दिन साजरा करण्यात आला, अशी प्रतीक्रिया पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली. महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले, असेही ते म्हणाले.
– डॉ. सिंगल

आपली प्रतिक्रिया द्या