Women’s Day गुलाबी स्वप्नांचा पाठलाग, पुणेकर मायलेकींनी बनवली रोझ वाईन

पुणेकर मायलेकींनी गुलाबापासून वाईन तयार करण्याचे तंत्र विकसित केले असून त्याचे पेटंटही मिळवले आहे. जयश्री यादव व त्यांची मुलगी कश्मिरा यादवभोसले यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. फुलापासून वाईन निर्मिती करणाऱया या मायलेकी जगातील पहिल्याच उद्योजिका ठरल्या आहेत. जगातील 140 देशांतून त्यांच्या वाईनसाठी मागणी आली आहे.

जयश्री आणि कश्मिरा या मायलेकींनी याआधीही अशा अनेक गोष्टी फुलांपासून बनवल्या आहेत. त्यामध्ये गुलकंद, सरबत तसेच गुलाबपाणी यांचा समावेश आहे. त्यांचा काही किलो गुलकंदाचा उद्योग आता टनापर्यंत गेला आहे. सुरुवातीला त्या शेतकऱ्यांकडून गुलाब विकत घेत, पण आता त्यांनी स्वतःची गुलाबाची बाग फुलवली आहे.

गुलकंदासाठी गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या काढताना वाईनचा विचार त्यांच्या मनात आला. गुलाबाचा सुगंध आणि स्वाद, तसेच औषधी गुणधर्म यामुळे वाईन बनवून पाहावी असे त्यांना वाटले आणि  त्यांनी त्यावर काम करायला सुरुवात केली.

सध्या बाजारात गुलाबाचा अर्क घातलेली वाईन उपलब्ध आहे. त्याला गुलाबाचा स्वाद असला तरी मूळ द्राक्षांपासून बनलेली असते. मात्र आम्ही तयार केलेली वाईन पूर्णपणे देशी गुलाबापासून बनवलेली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच वाईन असल्याने आम्हाला त्याचे पेटंट मिळाले आहे, असे जयश्री यांनी सांगितले.

या सर्व प्रवासात जयश्री यांना साथ मिळाली ती मुलगी कश्मिराची. वाईन निर्मितीचा विचार पुढे आल्यावर कश्मिराने ऑस्ट्रेलियात जाऊन ग्रेप वाईन निर्मितीचे प्रशिक्षण घेतले.

रोझ वाईनचे पेटंट मिळविण्यासाठी जयश्री यांनी अर्ज केला, पण ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. देशात आतापर्यंत फक्त द्राक्षे आणि फळांपासूनच वाईन तयार केली जात होती. त्यामुळे त्यांच्या वाईन प्रकल्पाला काही कायदेशीर अडचणीही आल्या. कायद्याच्या चौकटी पार करत  2009 साली जयश्री प्रॉडक्ट्सला रोझ वाईनचे पेटंट मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या